पुणे - दौंड शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात तालुक्यातील वेगवेगळ्या भागात 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाला असून केडगाव येथे एक व मेरगळवाडी येथे एक, असे ग्रामीण भागात दोन कोरोनाबाधित सापडले आहेत.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 31 संशयित नागरिकांच्या स्वँबचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी 16 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये दौंड शहरातील 15 जण व मेरगळवाडी येथील एका नागरिकाचा समावेश आहे.
मागील 3 दिवसात दौंड शहरांत तब्बल 23 रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणुचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. पडवी, यवत व मलठण येथे नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. गुरुवारी एका दिवसात दौंड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात एकूण 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही दौंड तालुक्यातील नागरिकांसाठी धक्कादायक बाब आहे.