पुणे - लोणावळा शहरात आईस्क्रिम वितरकाकडे चक्क दोन गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस आढळले आहे. याशिवाय लोखंडी कोयता, चाकू हेदेखील साहित्य या दुकानदाराकडून जप्त करण्यात आले आहे. सूरज विजय अगरवाल (वय-40) अशे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणच्या एलसीबी शाखेने केली.
एलसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आईस्क्रिम वितरक वर्धमान सोसायटी तालुका मावळ येथे दोन गावठी पिस्तुल बाळगून आहे. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे मिळाले. तसेच एका रूमच्या बाहेर पाहणी केली असता आणखी एक गावठी पिस्तुल आणि कोयता, चाकू मिळून आला आहे. याठिकाणांहून एकूण 1 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच विनापरवाना पिस्तुल बाळगल्या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय जगताप, सुनील जावळे, आदींनी केली.