पुणे - शेतजमीन अर्धेलीने करायला का घेतली? यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यामधून दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मिरजेवाडी येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाकण येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मच्छिंद्र किसन मांजरे (वय३५ ), किसन लक्ष्मण मांजरे (वय ६० ), असे जखमींचे नावे आहेत.
मच्छिंद्र मांजरे गोविंद भिकाजी जाधव यांच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी गोविंद यांनी हरिभाऊ भिकाजी जाधव यांची शेतजमीन अर्धेलीने करायला का घेतली?, असे मच्छिंद्र यांना विचारले आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. तो वाद इतका विकोपाला गेला, की गोविंद जाधव यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने मच्छिंद्र यांच्या मानेवर जोरात वार केला. दरम्यान, किसन लक्ष्मण मांजरे हे भांडणे सोडविण्यास गेले असता त्यांच्यावरही हातातील कोयत्याने डोक्यात, छातीवर वार केला. यामध्ये मच्छिंद्र आणि किसन दोघेही गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तत्काळ चाकण येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी भूषण किसन मांजरे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.