पुणे - मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या मित्रांपैकी एकाचा बोपदेव घाटा जवळील पठारवाडी तलावात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनिश तानाजी खेडेकर (वय 15, रा. संभाजी नगर, धनकवडी) असे मृत मुलाचे नाव आहे.
धनकवडी येथील एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नऊ मित्र बोपदेव घाट येथे गेले होते. तेथील पठारवाडी या तलावाजवळ ते वाढदिवस साजरा करत असताना सायंकाळी साडेपाच वाजता ते सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अनिश आणि अजून त्याचे चार मित्र पाण्यात बुडू लागले. त्यावेळी किनाऱ्यावरील बाकीच्या मित्रांनी चार जणांना वाचवले मात्र अनिश पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यात या मित्रांना अपयश आले. नंतर पाण्यात तो कुठेच दिसून न आल्यामुळे सर्व मित्र घाबरले. या प्रकरणाची रात्री साडेदहा वाजता अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री पाण्यात उतरत लाईफ रिंगच्या साह्याने रात्री साडेअकरा वाजता अनिलचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
कोंढवा अग्निशामक दलाचे अधिकारी रवींद्र हिरवरकर, जवान दशरथ माळवदकर, संदीप पवार, ओमकार ताठे गोविंदा गीते यांनी मृतदेह बाहेर काढला.