पुणे : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यामुळे त्यांच्यावर अनेकवेळा गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र असे असूनही त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या व्याखानाला हजारोंच्या संख्येने लोकं उपस्थित असतात. आता संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्य दिनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
'15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिन नाही' : नुकतेच पिंपरीतील दिघी येथे झालेल्या एका व्याख्यानमालेत संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. व्याख्यानात बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, 'देशाला 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळालं, मात्र हा खरा स्वातंत्र्य दिन नाही. कारण या दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे त्या दिवशी सर्वांनी उपवास करून दुखवटा पाळावा, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
'जन गण मन राष्ट्रगीत होऊ शकत नाही' : संभाजी भिडे पुढे बोलताना म्हणाले की, 'जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण ते रवींद्रनाथ टागोर यांनी 1898 रोजी इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते'. तसेच जोपर्यंत भगवा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायंच नाही, असे संभाजी भिडे यावेळी म्हणाले. दिल्लीवरती भगव्या झेंड्याचेच राज्य पाहिजे, असे देखील संभाजी भिडे यावेळी म्हणाले. रविवारी पिंपरी चिंचवड येथील दिघी परिसरात संभाजी भिडे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्याना दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
हे ही वाचा :
- Bageshwar Dham: धीरेंद्र शास्त्रींचे मोठे विधान! म्हणाले, तेव्हा हिंदू राष्ट्र होणार
- Devkinandan Thakur : 'प्रत्येक हिंदूने पाच मुलांना जन्म द्यावा.. लोकसंख्या नियंत्रण कायदा नसल्याचा फायदा घ्या..'
- Dhirendra Shastri On Hindu Nation: भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा.. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींची मागणी