पुणे - जिल्ह्यातील शिक्रापूरच्या सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने 144 गरोदर महिलांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये 69 गरोदर महिलांनी रेडिओलॉजिस्टकडून तपासणी केली होती, तर 75 महिलांनी रेडिओलॉजी सेंटरला भेट दिली आहे. या 75 महिलांचा रेडिओलॉजिस्टशी थेट संपर्क आला नव्हता. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या सर्व महिलांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य आधिकारी भगवान पवार यांनी दिली.
या सोनोग्राफी सेंटरमध्ये 6, 7 आणि 8 तारखेला या गर्भवती महिलांची तपासणी केली होती. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी 13 तारखेला स्वतःहून कोरोना चाचणी केली होती. 14 तारखेला त्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने त्या भागात अतिरिक्त वैद्यकीय पथकं पाठवली आणि या गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी हाती घेतली आहे. शिक्रापूर परिसरातील 31 गावांतील या सर्व महिला आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने परिसरातील गावांची आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण सुरू आहे. 31 गावांमध्ये 60 वैद्यकीय पथकं पाठवण्यात आली आहेत. त्याच बरोबर दौंड, खेड, चाकण परिसरातील आशा सेविकांनी गावांचा सर्व्हे सुरू केला आहे.
जिल्हा रुग्णालय या महिलांचे वैद्यकीय नमुने घेऊन पुण्यातील एनआयव्हीला पाठवणार आहे. सध्या या महिलांमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत नाही. एखादी गरोदर महिला पॉझिटिव्ह निघाली तर तिची व्यवस्था भारती आणि सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे.