पुणे- शहरात कोरोना बाधितांची संख्या १५ वर पोहोचली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. काल वाढलेल्या ४ रुग्णांची पार्श्वभूमी परदेशवारीची नाही. त्यामुळे, ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर, शहरातल्या काही भागात संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्याचा देखील विचार असल्याचे दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
हेही वाचा- पुण्यातील लाकडी फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही
विद्यापीठाचे हॉस्टेल रिकामे करण्यासाठी अजून कोणतीही सूचना नाही. ज्या ज्या ठिकाणी परीक्षा सुरू आहेत, तेथील विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडण्यासाठी कोणतेही महाविद्यालय बंधन टाकणार नाही, याच्या सूचना आम्ही संबंधित महाविद्यालयाना देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या कुटुंबीयांना कोणीही त्रास देऊ नये. रुगणांच्या नातेवाईकांनीही घराबाहेर पडू नये. एकाच्या चुकीमुळे संपूर्ण सोसायटीला वेठीस धरले जात असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. अशा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्या तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
परदेशातून आलेल्या व्यक्तींनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. अशा व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घराबाहेर पडू नये. काल पॉझिटिव्ह आलेल्या चार व्यक्तींमुळे खूप बदल झाला आहे, अशी माहिती म्हैसेकर यांनी यावेळी दिली. ११ ऑफिसरचा एक कोअर ग्रुप तयार करण्यात आला आहे..यामध्ये पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह ११ अधिकारी आहेत. कुठल्याही परिस्थितीत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. १०वी, १२वी ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहेत, त्यांनी स्वतःला बंधनं घालून शहरात फिरणे टाळावे. राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत. याव्यतिरिक्त ही परिस्थिती लक्षात घेता मनुष्यबळ आणि इतर जी मदत लागेल, त्यासाठी आवश्यक तो फंड देण्याची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे. काल रात्री मी स्वतः एक एफआयआर दाखल केली आहे. इथे कोरोनाचे रुग्ण झाल्याची माहिती एकाने दिली होती. त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे लक्षात येताच त्याचा नंबर आणि त्याने पाठवलेला मेसेज याद्वारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढेही अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
कलबुर्गी येथे एकाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तेथे काही विदर्भातील विद्यार्थी अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना काल सोलापूर येथे आणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यात कोणीही पॉझिटिव्ह नाही. त्या सर्वांना विदर्भातील त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण पुणे विभागात (पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा) आवश्यक त्या औषधाचा साठा करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आजच्या घडीला दोन ग्रुप आहेत, एक खूप घाबरले आहेत तर दुसरे निर्धास्त आहेत. या दोघांनीही घाबरू नये. पण स्वतःची काळजी घ्यावी. बाहेर जेवणासाठी हॉटेलमध्ये गर्दी करत असाल तर यापुढे करू नका. याविषयी लवकरच आम्ही परिपत्रक काढणार आहोत, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले. तर एमपीएससीच्या 31 मार्चपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्य आयोगाला विंनती करण्यात आली आहे. त्यावर काय निर्णय होतो हे लवकरच कळेल, असे विभागीय आयुक्त म्हणाले.