जुन्नर (पुणे) - जिल्ह्यात या हंगामात सुरू झालेल्या सोळा साखर कारखान्यांपैकी तेरा कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सध्या सोमेश्वर, भीमाशंकर व विघ्नहर हे तीन सहकारी कारखाने सुरू असून, एक आठवड्यात तेही बंद होणार आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी कोरोनाशी दोन हात करत अतिरिक्त ऊस संपवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आतापर्यंत सुमारे १३० लाख टन गाळप केले आहे.
सुरुवातीला मजुरांची टंचाई आणि कोरोनाच्या आक्रमणामुळे जिल्ह्यात ऊस शिल्लक राहील, अशी भीती होती. मात्र, सोमेश्वर, माळेगाव, भीमाशंकर, विघ्नहर अशा सहकारी कारखान्यांनी ऊसाचे टिपरे शिल्लक असेपर्यंत हंगाम चालू ठेवायचा, असा शब्द शेतकऱ्यांना दिला होता. दौंड शुगर, बारामती अॅग्रो, अंबालीका अशा खासगी कारखान्यांच्या अजस्र यंत्रणांनीही अतिरिक्त ऊस संपविण्यात मोलाची भूमिका बजावली. बहुतांश कारखाने १५० ते १८० दिवस चालले. सध्या तेरा कारखाने बंद झाले आहेत. आतापर्यंत सुमारे १३० लाख टन ऊसाचे गाळप झाले असून, जवळपास १४० लाख क्विंंटल साखर उत्पादन झाले आहे. बारामती अॅग्रो, माळेगाव, सोमेश्वर, विघ्नहर, दौंड शुगर या चारच कारखान्यांनी जवळपास निम्मा ऊस गाळप केला आहे.
जादा ऊसाचे आव्हान पूर्ण
जादा ऊसाचे आव्हान आम्ही पूर्ण केले असून, दहा लाखापेक्षा जास्त ऊस गाळप केले आहे. सर्व ऊस संपवून दोन-तीन दिवसांत कारखाना बंद होणार आहे. अशी माहिती विघ्नहर कारखानाचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली आहे.
चार मेपर्यंत कारखाना बंद
उन्हाची तीव्रता वाढल्यावर आणि कोरोनाचा कहर वाढल्यावरही ऊसतोड मजूर विश्वासाने थांबवू शकलो. ऊस संपत आला असून, चार मेपर्यंत कारखाना बंद होऊ शकेल. अशी माहिती अनुराग कारखानाचे कार्यकारी संचालक प्रकाश पवार यांनी दिली.
बहुतांश ऊस संपवून शेतकऱ्यांना दिलासा
हार्वेस्टरसारखी यंत्रे बंद झाली आहेत. बहुतांश ऊस संपला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता अडचणीतला ऊस काढत आहोत. पाच मेपर्यंत हंगाम संपू शकेल. अशी माहिती भीमाशंकर कारखानाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली.