पुणे - चाकण औद्योगिक वसाहतीतील एका नामवंत कंपनीतील 120 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीत खळबळ पसरली आहे. कंपनी व परिसर कंन्टेमेंट झोन करण्यात येऊन आरोग्य विभागाने कंपनी परिसरात शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) पाहाणी केली. यावेळी गट विकास आधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे, सभापती अंकुश राक्षे उपस्थित होते.
चाकणमधील एका नामवंत कंपनीत 120 कामगारांना कोरोनाची लागण झाली यातील काही कामगार पिंपरी-चिंचवड तर काही खेड तालुक्यातील आहेत. या कामगारांच्या संपर्कातील अनेक जण असल्याने या कंपनीच्या संसर्गामुळे खेड तालुक्यातील समुह संसर्गाच्या माध्यमातून मोठी संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
खेड तालुक्यात 1 हजार 371 रुग्णांची नोंद झाली असून 861 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 25 जणांना मृत्यु झाला आहे. चाकण औद्योगिक वसाहत व राजगुरुनगर, चाकण, आळंदी व खेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यात अपयश येत असल्याने पुढील काळात कोरोनाच्या संसर्गाचे हे वाढते जाळे धोक्याची घंटाच आहे.
एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग तर दुसरीकडे खासगी रुग्णालयांकडून अवास्तव बिलांची वसूली केली जात आहे. या सर्व घटनांकडे प्रशासनाकडून गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे.