पुणे - लॉकडाऊन काळात घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 21 वर्षाच्या या तरुणाने 112 घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. घरफोड्या आणि जबरी चोऱ्या उघडकीस आणून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून तब्बल सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. रोहित नानाभाऊ लंके असे या 21 वर्षीय चोराचे नाव आहे.
21 व्या वर्षात 112 घरफोड्या
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका क्लिनिकमधून चोरट्यांनी 70 हजारांचा मुद्देमाल चोरी केला होता. याबद्दल तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात निलेश लंके हा आढळून आला. त्याविषयी अधिक माहिती गोळा केली असता चोरीच्या गुन्ह्यांत अनेकदा तुरुंगवारी केली असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला या गुन्ह्यात वर्ग करून घेतले. त्याच्या अधिक चौकशीत त्याने साथीदारांसह ही चोरी केल्याचे कबूल केले. याशिवाय त्यांनी या मधल्या कालावधीत केलेल्या तीन घरफोड्या आणि दोन जबरी चोरीचे कुणीही पोलिसांनी उघडकीस आणले. त्याच्या ताब्यातून 100 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असा सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.