पुणे: येरवडा येथे पूर्व वैमनस्यातून 13 जणांनी पूर्व नियोजन करून दोघांचा खून केल्याची घटना शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी पहाटे घडली होती. यात सुभाष उर्फ पापा किसन राठोड (वय 40), अनिल उर्फ पोपट भिमराव वाल्हेकर (वय 35, रा. लमाण तांडा, येरवडा) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या खून प्रकरणातील 11 आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
11 आरोपींना अटक: या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या माजी नगरसेविकेचा सासरा शंकर मानू चव्हाण (55), दीर बादल शंकर चव्हाण (25), यासह अनिल उर्फ तम्मा महेश देवरा (50), रोहित उर्फ निखिल परशुराम संके (20), निशांत तायप्पा चलवादी (20), कृष्णा राजू पवार(20), शिवशंकर अंजनकुमार हरगुडे (20), साहिल राम कांबळे (20), गौरव उर्फ साहिल रवी चव्हाण (20), सोनू शँकर राठोड (23, सर्व जन रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा), व एक अल्पवयीन मुलास येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत फिर्याद जखमी लक्ष्मण किसन राठोड (49, रा. पांडू लमाण वस्ती) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे.
असा रचला कट: मृत सराईत गुन्हेगार सुभाष राठोड याने २००८- ०९ दरम्यान शंकर चव्हाण यांच्यावर फायरिंग केले होते. त्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगून राठोड बाहेर आला होता. मात्र यानंतर दोघांच्या टोळीतील वाद सुरू होते. अनिल वाल्हेकर, सुभाष राठोड व आणखी एक त्यांचा साथीदार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरुन येरवडा परिसरातून जात होते. त्यावेळी ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्यांना वाटेत अडविले. त्यांच्यावर सपासप वार करुन त्यांचा निर्घुण खून केला होता.