पुणे - महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 6 जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अनेक नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराचे 1 हजार जवान रवाना झाले आहेत, अशी माहिती भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
लष्कराच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेळगाव, बागलकोट रायचूर, कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 500 नागरिकांना भारतीय सैन्याच्या जवानांनी बाहेर काढले आहे. त्याप्रमाणेच या जिल्ह्यांमध्ये 1300 नागरिक पुराच्या पाण्यामाध्ये अडकल्याची शक्यता ही लष्कराने वर्तवली आहे.
पुण्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) तुकडी देखील कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहे. दरम्यान, पाऊस सुरू असल्यामुळे भारतीय लष्कर आणि एनडीआरएफला पूरग्रस्त परिसरांमध्ये पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. मात्र, तरी देखील मदत आणि बचाव कार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याचे भारतीय लष्कराच्या वतीने सांगण्यात आले आहे.