परभणी - लोकांचा शिक्षणाकडे ओढा वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुण तयार होत आहेत; परंतु, त्या प्रत्येकाला शासन नोकरी देऊ शकत नाही. म्हणून देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी कौशल्य विकासित करून व्यवसायाच्या माध्यमातून तरुणांनी उद्योजक बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी काल (शनिवारी) परभणी येथील दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज (डिक्की) कार्यालयाच्या उद्घाटनवेळी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिक्की मराठवाडा समन्वयक प्रफुल्ल पंडित तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ.परमेश्वर साळवे, बडोदा बँकेचे प्रबंधक प्रमोद मेश्राम, जिल्हा समन्वयक प्रफुल्ल पैठणे होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी शिवाशंकर म्हणाले, परभणीमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतल्या जाते. आशा शेती उत्पादनावर आधारित तरुणांनी पुढे येत स्थानिक प्रक्रिया उद्योग 'डिक्की'च्या माधमातून सुरू करावेत. यासाठी शासनाच्या आरसेटी, कौशल्य विकास सारख्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मुद्रा कर्ज आणि अनुदान घेऊन उद्योग उभारावेत. यातून स्थानिक रोजगार निर्माण होईल. यासाठी डिक्कीने शाळा, कॉलेजमध्ये आणि समाजात याविषयी जनजागृती करावी, असे देखील आवाहन त्यांनी केले.
यावेळी डिक्कीच्या माध्यमातून गॅस वाहतूक उद्योग सुरू केलेल्या प्रफुल्ल पैठणे, प्रकाश साळवे, संजय खिल्लारे, राजेश घोडके, सिध्दांत जगतकर, आकाश सदावर्ते, सचिन महामुने, हर्षवर्धन मस्के या तरुणांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात परभणी जिल्हा दुष्काळाने पिडलेला आहे, हे मागासलेपण दूर करण्यासाठी आणि दलित-अदिवासी तरुणांना उद्योजक करण्यासाठी डिक्कीचे परभणीत कार्यालय सुरू करण्यात आल्याचे विभागीय अध्यक्ष प्रफुल्ल पंडित यांनी सांगितले. सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संजय खिल्लारे यांनी केले. कार्यक्रमास उद्योजक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.