परभणी - तालुक्यातील सोन्ना येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी त्यांच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तानाजी चांगोराव गमे असे या 40 वर्षीय मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर फायनान्सचे कर्ज आहे. ते फेडण्यासाठी यंदा त्यांनी शेतीवर मोठा खर्च केला होता. परंतु यंदा शेतात काही पिकलेच नाही. त्यामुळे त्यांच्यावर खासगी कर्ज वाढत गेले. त्यातच मुलीचे लग्न कसे करू? या प्रश्नाने त्यांना ग्रासले होते. या विवंचनेत असताना त्यांनी काल (मंगळवारी) शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. परंतु विहिरीत उडी घेतल्याची माहिती कोणालाही नव्हती. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्यांची शोधाशोध केली.
'दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला मृतदेह'
मंगळवारी बेपत्ता झालेले तानाजी गमे यांची कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता, आज (बुधवारी) त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर दैठणा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाची सध्या अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.