परभणी - अत्यंत चुरशीची लढत झालेल्या आणि कुठल्याच पॅनलला स्पष्ट बहुमत न मिळालेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी 6 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी बँकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली आहे. नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार ? याकडे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड मंगळवारी (6 एप्रिल)ला होणार आहे. यापूर्वी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक 21 मार्च रोजी झाली होती. तर 23 मार्च रोजी मतमोजणी झाली. मात्र, आता मंगळवारी अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड होणार आहे. सहकार खात्याने या दोन्ही पदाच्या निवडीसाठी बँक सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा बोलावली आहे. त्यात या पदासाठी निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
निवडणुकीत चुरस
दरम्यान, संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांचे पॅनल एकमेकांपुढे उभे ठाकले होते. मात्र या दोन्ही पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तर दोन स्वतंत्र उभ्या राहिलेल्या उमेदवारांनी आपली बाजू स्पष्ट न केल्याने त्यांचा पाठिंबा कोणाला असेल ? याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नूतन संचालकांची देखील भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. राष्ट्रवादीचे नेते आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी 'राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, यासाठी वरिष्ठांकडे चर्चा करणार' असे सांगून, निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.
दावे किती खरे होणार
विशेष म्हणजे आमदार सुरेश वरपुडकर यांनी त्यांच्या पॅनेलला 11 जागा मिळाल्याचा दावा केला आहे. तर आमदार बोर्डीकर यांनी त्यांच्या पॅनलला 9 जागा मिळाल्या असून, स्वतंत्रपणे उभे राहिलेले दोन संचालक आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे 21 सदस्यांच्या संचालक मंडळात कुठल्या पॅनलला बहुमत मिळेल, हे मंगळवारी (7 एप्रिल) स्पष्ट होईल.
घोडेबाजार तेजीत !
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अनेक वर्ष माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची सत्ता राहिली आहे. त्यामुळे यंदा ते पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरले आहेत. तर विद्यमान सत्ताधारी असलेल्या आमदार सुरेश वरपुडकर यांनी देखील सर्व शक्ती पणाला लावली आहे.सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वरपूडकर हे पॅनलमधून उभे ठाकले होते. मात्र, मतदानापूर्वी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देत नसल्याच्या आरोप करून आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आले असून,आता दुर्रानी यांनी त्यांचा गट तयार करुन अध्यक्षपदासाठी चे प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे असलेले परंतु स्वतंत्रपणे निवडून आलेले गणेशराव रोकडे आणि बालाजी देसाई या संचालकांना आपल्या गटात सामावून घेण्यासाठी दोन्ही पॅनलकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. यात कोणाला यश येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एकूणच दोन्ही पॅनेलला स्पष्ट बहुमत नसल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जोरदार घोडेबाजार चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.यात कोण बाजी मारणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.