परभणी - दोन दिवसापूर्वी परभणीत दाखल झालेली कोरोनाची लस आज प्रत्यक्ष कोरोना योद्ध्यांना देऊन या लसीकरण मोहिमेला आरंभ झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात भूलतज्ञ डॉ. दुर्गादास पांडे यांना पहिली लस देवून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी हा डोस घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - परभणीतील 498 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी होणार मतदान
गेल्या वर्षभरापासून ज्या कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे, त्यावर अखेर लस शोधून काढण्यात आली. ही लस पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा रुग्णालय, महापालिका आरोग्य केंद्र, जांब प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात नोंदणी केलेल्या 400 आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली.
डॉ. पांडे, डॉ. नागरगोजे यांना पहिला मान
जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविडच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. लसीचा पहिला लाभार्थी म्हणून जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ञ डॉ. दुर्गादास पांडे यांना मान मिळाला. त्या पाठोपाठ जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी हा डोस घेतला. यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपमहापौर भगवानराव वाघमारे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके, डॉ. किशोर सुरवसे, डॉ. भगवान धुतमल, नगरसेवक चंदू शिंदे, तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
9 हजार 330 डोसची उपलब्धता
9 हजार 330 डोस भांडारामध्ये उपलब्ध झाले. त्यानंतर आज शनिवारपासून तीन ठिकाणी ही लस देण्यास सुरवात झाली. यात परभणी जिल्हा रुग्णालय, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच परभणी शहरातील जायकवाडीतील महानगर पालिकेच्या दवाखान्यातील आरोग्य अधिकारी- कर्मचार्यांना लस देण्यास सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हा रुग्णालयासह महापालिकेच्या दवाखान्यास भेट देऊन लसीकरण मोहिमेची पाहणी केली. यावेळी नगरसेविका मंगल मुद्गलकर, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत, नगरसेवक सचिन देशमुख आदींची उपस्थिती होती.
पहिला मान मिळाल्याचा आनंद - डॉ. पांडे
जिल्ह्यात कोविड लसीचा पहिला मान मिळाल्याचा आपणास आनंद झाल्याची प्रतिक्रिया जिल्हा शासकीय रुग्णालयातील भूलतज्ञ डॉ. दुर्गादास पांडे यांनी दिली. गेल्या आठ, दहा महिन्यांपासून कोविड योद्धा म्हणून जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचारी कोरोनाविरोधात अहोरात्र लढत आहेत. आजचा दिवस त्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील कोविड लसीकरणाला आजपासून सुरुवात केली. कोविडविरुद्धच्या लढाईतीली हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. याच दिवशी परभणीतसुद्धा लसीकरणास प्रारंभ होत असून, पहिला मान आपणास मिळाल्याचा विशेष आनंद होत आहे, असे देखील डॉ. पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कोविड लस पूर्णतः सुरक्षित - डॉ. नागरगोजे
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात या लसीकरणाच्या निमित्ताने वैद्यकीय अधिकारी, तज्ञ, कर्मचार्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतल्याचे दिसून आले. लसीविषयी काही गैरसमज पसरविले जात होते. परंतु, कोविडची लस पूर्णतः सुरक्षित व परिणामकारक अशी आहे, असे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना सांगितले.
पुढच्या टप्प्यातील लसीकरणाची तयारी - जिल्हाधिकारी मुगळीकर
लसीकरणाच्या आजच्या पहिल्या टप्प्यात परभणी जिल्ह्यातील चार ठिकाणी 400 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ही लस दिली जात आहे. तर, पुढच्या टप्प्यात परभणीतील वयोवृद्ध आणि लहान बालकांना ही लस दिली जाणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून लसीकरण मोहीम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यात लस देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. ज्यामध्ये लस देण्यात आलेल्या व्यक्तीला लस देण्यापूर्वी व त्यानंतर काही वेळ डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येत आहे. याची काही दुष्परिणाम होतात का, याची देखील तपासणी होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
हेही वाचा - परभणी: आणखी दोन गावातील कोंबड्यांना 'बर्डफ्लू'; परिसरात प्रतिबंध