परभणी - वसमत रोडवर आयोजित दिव्यांगांसाठीच्या मोफत साहित्य वाटप शिबिरात ८२८ जणांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. ह. भ. प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते.
महाराज म्हणाले, आपले जीवन समाज उपयोगी असावे. माणसाने देवळात जावून दान धर्म करण्यापेक्षा दिव्यांगांची मदत करावी. दिव्यांगाना पाय देवून खरा परमार्थ साधता येतो. मंदिरे बांधण्यापेक्षा या दिव्यांगांची सेवा ही खरी ईश्वर सेवा आहे. परभणी महानगर भाजप व भारतीय साधारण बीमा निगम सी. एस. आर. प्रकल्पांतर्गत भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगासाठी मोफत साहित्य वाटप शिबीर १ ते ६ मार्च या कालावधीमध्ये होत आहे. व्यासपीठावर नामवंत डॉ. नारायण व्यास, त्यांचे सहकारी, आरोग्य दूत ज्ञानेश्वर वाघमारे भाजप संघटन सरचिटणीस संजय शेळके, मोहन कुलकर्णी, मनपा सदस्य मधुकर गव्हाणे, प्रशांत सांगळे, रितेश जैन, अतिक पटेल, अरुण कदम, भागवत पाटील, बाळू कदम होते.
या संपूर्ण शिबिरात ७५ लक्ष रुपयांचे साहित्य दिव्यांगाना मोफत वाटप करण्यात येणार आहे. १ मार्च रोजी जवळपास ११५७ दिव्यागांची प्राथमिक कान तपासणी, पायानी विकलांग असलेल्या रुग्णांची पाय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्यानुसार, ८२८ गरजू दिव्यागांना जयपुर फुट, कँलिपर्स, कुबड्या, तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, काठी, वॉकर तसेच विकलांगांसाठीचे इतर साहित्य मोफत वाटप करण्यात आले. तसेच पायाने दिव्यांगासाठी जयपूर येथील प्रसिद्ध कारागीर यांनी दिव्यांगाच्या पायाची तपासणी करून लगेच त्या आकाराचा पाय तयार करून दिला. शिबिरासाठी बाजार समिती संचालक रामभाऊ आरगडे, सरपंच अंकुश आवरगंड, एन. डी. देशमुख, सरपंच गुलाब पंढरकर, सरपंच अशोक जोंधळे, सरपंच संदिप जाधव आदींनी परिश्रम घेतले.