परभणी - लग्नासाठी कपडे खरेदी करून घरी परतणाऱ्या २ दुचाकीस्वार तरुणांचा टँकरला धडकून मृत्यू झाला. ही घटना जिंतूर तालुक्यातील येलदरी रस्त्यावर घडली. गोपाल शेषराव सातपुते (१६) आणि वैभव नारायण सातपुते (१७) अशी मृतांची नावे आहेत.
मृत दोन्ही युवक शनिवारी त्यांच्या घरी लग्न असल्याने जिंतूरच्या बाजारात दुचाकी (एमएच २२ एचई - ३५६०) वर आले होते. लग्नासाठी साड्या, कपडे खरेदी करून शुक्रवारी रात्री १० वाजता ते गावाकडे दुचाकीने परत निघाले. दरम्यान, येलदरी रस्त्यावर शेवडी येथून पाणी भरून जिंतूर शहराकडे येत असलेल्या टँकरला (एमएच१६, बी ५०७७) त्यांची पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर समोरासमोर धडक झाली.
या धडकेत गोपाळ शेषराव सातपुते हा युवक जागीच ठार झाला. तर वैभव नारायण सातपुते याच्यावर प्राथमिक उपचार करून परभणी येथे नेत असताना तो रस्त्यामध्येच मृत झाला. या दोन्ही तरुणाच्या निधनाने लग्न सोहळ्यावर आणि संपूर्ण कोळपा गावावर शोककळा पसरली आहे.