परभणी - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर, आज(मंगळवार) संभाव्य रुग्णांपैकी 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही परभणीकरांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. तर, सध्यस्थितीत रुग्णालयात चार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
परभणी जिल्हा रुग्णालयाला आज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालापैकी 20 संभाव्य रुग्णांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत संभाव्य रुग्णांची संख्या 2 हजार 539 झाली असून, त्यापैकी 2 हजार 504 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, 80 स्वॅबचा अहवाल अनिर्णायक आला आहे. तसेच, 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचा अभिप्राय प्रयोगशाळेकडून आला आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 93 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 86 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. आता कोरोनासाठी उभारण्यात आलेल्या स्वतंत्र रुग्णालयात अवघे चार कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आज मंगळवारी रुग्णालयात नवीन 14 संशयीत रुग्ण दाखल झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने त्या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी करत त्यांचे स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात प्रलंबित अहवालांची संख्यादेखील 200 ते 300 च्या घरात गेली होती. त्यामुळे परभणी जिल्ह्यात कोरोनाबाबत एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती. परंतु, सध्याच्या परिस्थितीत नांदेड प्रयोगशाळेत प्रलंबीत स्वॅबची संख्या केवळ 15 एवढीच राहिली आहे. त्यामुळे या बाबतीत देखील परभणीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तर, यापूर्वी 2 हजार 443 जणांनी विलगिकरणाचा कालावधी पूर्ण केला. मात्र, असे असले तरी अजूनही पुणे-मुंबई आणि काही रेड झोन जिल्ह्यांमधून परभणीत येणाऱ्या लोकांची संख्या कमी झालेली नाही. दररोज चेक पोस्टवर अडविण्यात आलेले आणि स्वतःहून जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगिकरण कक्षात 243 तर संसर्गजन्य कक्षात 22 जणांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.