परभणी - केंद्र सरकारने आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या सीमा शुल्कात १० वरून थेट साडेबारा टक्के वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निश्चितच सोन्याचे भाव वाढणार आहेत. विशेषत: याचा फटका भारतातील महिलांना बसणार आहे. याबद्दल परभणीतील सर्वसामान्य महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर व्यवहार मंदावतील या भीतीने व्यापारी देखील नाखुश आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या मोदी सरकार-२ चा आज अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात देशांतर्गत होणाऱ्या सोन्याच्या आयात-निर्यातीतील सीमाशुल्कात १० वरून थेट साडेबारा टक्के अशी घसघशीत वाढ केली. आधीच तोळाभर सोन्याचा दर ३५ हजार रुपयांवर पोहोचल्याने सोन्याचे दागिने हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहेत.
असे असतानाच या दरवाढीचा फटका भारतातील सामान्य कुटुंबातील महिलांना बसणार आहे. याबद्दल गृहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे आता सोन्याच्या दागिन्यांची हौस-मजा करता येणार नाही. काटकसरी करावी लागेल. दोन ऐवजी एकच तोळा सोने घेऊन हौस भागवावी लागेल, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे.
तर दुसरीकडे येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन अंबिलवादे यांनी या शुल्कवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांकडून यापूर्वी आकारल्या जाणाऱ्या सीमा शुल्कात कपात करण्याची मागणी होत असताना ती मागणी फेटाळून लावत केंद्र सरकारने हा वाढवलेला कर निश्चितच व्यापाऱ्यांना फटका देणार आहे. त्यामुळे व्यवहारावर फरक जाणवणार असल्याचे देखील अंबिलवादे म्हणाले.