परभणी - कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आज मंगळवारी तब्बल 1033 नवे रुग्ण आढळले, तर 20 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच 735 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. दरम्यान, कोरोना इस्पितळांमध्ये अजूनही 397 बेड शिल्लक असून गेल्या चोवीस तासात 1446 रुग्णांची तपासणी झाल्याचे माहिती आरोग्य विभागाने दिले आहे.
25 हजार 440 व्यक्ती कोरोनामुक्त -
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून मंगळवारी 1033 नवीन बाधित आढळले तर 20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 6 हजार 860 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 833 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत 33 हजार 133 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 25 हजार 440 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 32 हजार 949 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 99 हजार 840 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 33 हजार 133 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 927 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.
या रुग्णालयात झाले कोरोनाबधितांचे मृत्यू -
दरम्यान गेल्या 24 तासात 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 15 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल (3), आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटल (6) आणि जिल्हा परिषदेच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये (2) असे 11 रुग्ण मृत्यूमुखी पडले. याशिवाय चिरावू, अबोली, पाडेला, भारत, स्वाती, सूर्या, आनंद आणि धानोरकर हॉस्पिटलमध्ये एकूण 9 रुग्ण दगावले आहेत.
परभणी जिल्ह्यात 397 बेड शिल्लक -
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खाजगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना हॉस्पिटल सुरू आहेत. ज्यामध्ये 7 हजार 582 रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व 30 रुग्णालयांमध्ये 6 हजार 901 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या केवळ 397 बेड रिकामे आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक बेड रेणुका हॉस्पिटल येथे 135 बेड रिकामे असून, त्याखालोखाल जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटल मध्ये 59 बेड शिल्लक आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 1, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 42, भारत हॉस्पिटल 22, स्वाती हॉस्पिटल 4, पाडेला 4, डॉ.प्रफुल पाटील हॉस्पिटल 24, अक्षदा मंगल कार्यालय 46, सूर्या हॉस्पिटल 2, मोरे 3, अनन्या 3, सामाले हॉस्पिटल 3, ह्यात हॉस्पिटल 1, सिद्धिविनायक 4, सुरवसे मॅटर्निटी 4, देहरक्षा हॉस्पिटल 11, स्पर्श हॉस्पिटल 11 तर गोकुळ हॉस्पिटलमध्ये 5 तर पार्वती हॉस्पिटलमध्ये 4 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय 5 हजार 420 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.
1446 संशयितांची तपासणी -
दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1 हजार 446 संशयितांची 'आरटीपीसीआर' चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये मनपाच्या विविध केंद्रांवर 264 तर जिल्हा रुग्णालयात 177, गंगाखेड तालुका 254, पूर्णा 205, सोनपेठ 14, पाथरी 196, सेलू 69, मानवत 40, तर जिंतूर ततालुक्यात 226 संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या.