परभणी - दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परभणी शहरातील 3 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील 5 ठिकाणच्या 5 व्यक्तींना त्यांच्या घरी होम-क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांच्या 'स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, परभणीत अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. पण, दिल्लीच्या कार्यक्रमात जाऊन आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करण्यात आल्याने आल्याने परभणीकरांची चिंता वाढली आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्यामुळे चिंता अधिक प्रमाणात आहे. असे असले तरी परभणीत मात्र अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेला नाही. परंतु कालच दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुस्लीम भाविकांना मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आल्याने देशात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे परभणी शहरातील तीन जण या जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ते तिघे जण परभणीत 13 मार्च रोजी आले आहेत. त्या व्यक्तींना परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांच्या घरून ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्या घशातील 'स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, ते पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. मात्र, या दरम्यान सदर तिघा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, गंगाखेड आणि दैठणा या ठिकाणच्या 5 व्यक्तींनादेखील संबंधित पोलीस ठाण्यांना आदेश देऊन पोलिसांमार्फत ताब्यात घेऊन त्यांच्या-त्यांच्या घरातच विलगीकरण अर्थात होम-क्वारंनटाईन करण्यात आले आहे. त्यांच्याही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्याचा लवकरच अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती मुगळीकर यांनी दिली आहे.
एकूणच परभणी शहरात तसेच जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नसला तरी संशयितांची मात्र मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन लाखांहून अधिक घरांमध्ये अशा वर्कर्स आणि आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी भेट देऊन आरोग्य तपासणी केली आहे. पण, जमातमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये परभणीचे तीन जण असल्याच्या बातमीने परभणीकरांची चिंता वाढली आहे. यावर प्रशासन तात्काळ उपायोजना करून पुढील कारवाई करत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.
हेही वाचा - परभणीतील कृषी विद्यापीठातील बीज पैदास केंद्राच्या इमारतीला आग; सहयोगी अधिष्ठात्यांचे दालन जळून खाक