परभणी - घरफोड्या करणारे दोन चोरटे आणि एका मोटरसायकल चोराला परभणीचे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोठ्या शिताफीने गजाआड केले. ही कारवाई बुधवारी (दि. 30 डिसें.) रात्री उशीरा करण्यात आली असून, या चोरट्यांना आज (गुरुवारी) नवामोंढा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
'क्वारंटाईन कुटुंबांच्या घरात डल्ला'
कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. तसेच त्या काळात अनेकजण क्वारंटाइन असल्याने त्यांच्या घरांना कुलूप होते. त्यामुळे त्या काळात चोरट्यांनी अशी सुमारे अर्धा डझन घरे फोडली होती. अशा घरांमध्ये चोरी करत तेथील सोन्या-चांदीच्या वस्तुंसह रोख रक्कम लांबवली आहे.
'दुचाकी चोरट्यासही अटक'
विशेष पथकाचे फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचारी शहरात गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती मोटारसायकलवर संशयितरित्या फिरताना बुधवारी (30 डिसें.) रात्री आढळला. त्या व्यक्तीची पथकातील कर्मचार्यांनी चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मोटारसायकलबद्दल विचारले. त्यावेळी त्याच्याकडे कुठलेही कागदपत्रे आढळली नाहीत. त्याच्यावरचा संशय बळावल्याने त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने ती मोटारसायकल टाळेबंदीच्या काळात परजिल्ह्यातून चोरल्याचे कबूल केले. त्यामुळे पथकाने त्याला ताब्यात घेत दुचाकी जप्त केली. या चोरट्याला देखील नवामोंढा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
हेही वाचा - सरत्यावर्षाला साधेपणाने निरोप द्या; परभणी जिल्हा प्रशासनाचे जल्लोषावर निर्बंध
हेही वाचा - परभणी : फसवणूक करणारा पोलीस कर्मचारी निलंबित