परभणी - जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण येथे काही अज्ञात चोरट्यांनी नाशिक येथे आरोग्य खात्यात कार्यरत असलेल्या एका कोरोना योद्ध्याच्या घरात हात साफ केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरी करून घरातील अडीच लाख रुपयांचा सोन्या चांदीचा माल लंपास केला. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
गडदगव्हाण येथील मिलिंद वाटोडे हे शुक्रवारी रात्री गर्मीमुळे घराला कडी लावून बाहेर अंगणात झोपले होते. त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी डाव साधला. घराची कडी काढून आत प्रवेश केला. कपाटातील सोने, चांदी व पैसे असा एकूण 2 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मिलिंद वाटोडे हे गावातच मजुरी करतात, तर त्यांचे भाऊ हे नाशिक जिल्ह्यातील काजी सांवगी येथे आरोग्य खात्यात सेवा बजावत असून, ते कोरोना योद्धे आहेत.
दरम्यान, या प्रकरणी मिलिंद कुंडलिक वाटोडे यांनी जिंतूर पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यात म्हटल्याप्रमाणे ते आई, पत्नी व मुले जेवल्यानंतर गर्मी होत असल्याने रात्री 10 वाजता घराला कडी लावून अंगणात झोपले होते. मात्र, पहाटे 4 वाजता त्यांची आई मथुराबाई यांना जाग आली. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा घराच्या दाराची कडी निघालेली दिसून आली. आतमध्ये जाऊन पाहिले असता, कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या, कानातील झुंबर व इतर दागिने आणि चांदीचे जोड तसेच 80 हजार रुपये रोख, असा एकूण दोन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल गायब झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
एकीकडे कोरोना युद्धात नाशिक जिल्ह्यात सेवा बजावणाऱ्या वाटोडे यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा सुरू ठेवली आहे, तर दुसरीकडे चोरट्यांनी त्यांच्या घरात हात साफ केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.