परभणी - शहरातील कारेगाव रस्त्यावरील श्रीरामनगरात आज दिवाळीच्या पहाटेच चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 7 हजार रुपये रोख, टीव्ही आणि सोन्याचे दागीने असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या हाती फारसे धागेदोरे लागले नाहीत.
श्रीराम नगरातील रहिवाशी योगेश पांचाळ हे कुटुंबीयांसह 2 नोव्हेंबरला पुण्याला गेले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ते परत आले. घराचा दरवाजा उघडाच असल्याचे पाहून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने नवामोंढा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर येऊन पाहणी केली. तसेच तपासाला सुरुवात करत श्वान पथकासही घटनास्थळावर पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता, पांचाळ यांच्या घरास कालपर्यंत कुलूप असल्याची माहिती दिली. त्यावरून ही चोरीची घटना शनिवारी पहाटेच्या सुामारास झाली असल्याचे स्पष्ट झाले.
लाख रुपयांचा ऐवज लंपास -
दरम्यान, पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल्या प्रमाणे, ते 2 नोव्हेंबरला दवाखान्यानिमित्त आई-वडील, पत्नी व इतर सदस्यांसह पुणे येथे गेले होते. जाताना दारास कुलूप लावून त्यावर कपडा झाकला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आज (शनिवारी) सकाळी ते परत आले तेव्हा त्यांना कुलूप तोडून घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घरात जाऊन पाहिले असता घरात टीव्ही नव्हता, त्याच बरोबर कपाटातील सोन्याचे दागीनेही गायब झाले होते. तसेच घरात ठेवलेले 7 हजार रुपयेही चोरट्यांनी चोरून नेल्याचे नमूद केले आहे. सोन्याच्या दागिन्यात नेकलेस, अंगठ्या आदींचा समावेश असून, नगदी सात हजरा रुपयांसह एकूण 1 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.