परभणी- बँकेच्या एटीएममध्ये पैसे न भरता ते भरल्याचा बनाव रचणाऱ्या दोन चोरट्यांचे बिंग पोलीस तपासात फुटले आहे. या चोरट्यांनी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या जाळलेल्या 'एटीएम’मध्ये दमडीही भरली नव्हती. दरम्यान, जळालेल्या ‘एटीएम’ व ‘सीडीएम’ मशीनमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या रकमेचे नुकसान झाले आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीपुढील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेबाहेर एटीएम आणि सीडीएम मशीन आहे. बुधवारी (4 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास त्यास आग लागली. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे ही आग भडकली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या आगीत एटीएम आणि सीडीएम मशीन जळून खाक झाले होते. परंतु, ही आग शॉर्टसर्किटने नव्हे तर एका तरुणाने पेट्रोल टाकून लावल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर उघड झाले होते. मात्र, त्याने हे एटीएम केंद्र नेमके का जाळले, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, घटना घडल्यानंतर नवामोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी ‘एटीएम’मधील ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले असताना त्यात रात्री दोनच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने पेट्रोल टाकून ‘एटीएम’ मशीन जाळल्याचे दिसून आले. त्यावरून बँकेच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीने एटीएम जाळल्याचे तक्रारीत नमूद केले. यात 13 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत नंदकुमार गोपाळराव पुरी व गोविंद रामेश्वर अंभोरे (दोघेही रा.संजय नगर,बोरी, ता.जिंतूर) या आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी सीडीएम मशीनमध्ये 1 लाख 44 हजार रुपये टाकल्याचे सांगितले. मात्र, 'एवढी मोठी रक्कम टाकल्यानंतर आपल्याला मशीनमधून पावती आली नाही. तसेच मोबाईलवर मॅसेजही आला नाही. त्यामुळे आपण बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला नाही. एवढी मोठी रक्कम मशीनमध्ये टाकल्यानंतरही खात्यात रुपये जमा झाले नसल्याने आपण रागाच्या भरात एटीएम जाळल्याचे पोलिसांना सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात सीडीएम मशीन उघडून त्या मशीनची तपासणी केली असता, या चोरट्यांनी ती रक्कम भरलीच नव्हती, हे स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली.