परभणी - इंधनाचे दर आज (बुधवारी) देखील पुन्हा एकदा भडकले आहेत. त्यात उच्चांकी दरामुळे परभणीकरांना चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. परभणीत आज पेट्रोल 114.79 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत असून, डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. डिझेल 97.44 पैसे दराने विक्री होत आहे. तसेच पावर पेट्रोल 119 रुपयांच्या पुढे गेले. महत्त्वाचे म्हणजे राज्यासह देशात सलग दुसऱ्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 85 पैश्यांने वाढ झाली आहे.
राज्यात सर्वाधिक दर परभणीत - दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने परभणीतील रेकॉर्ड कायम ठेवला आहे. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणीकारांना घ्यावे लागत आहे. परभणी शहरात आज (बुधवार) पावर पेट्रोल तब्बल 119 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर साधे पेट्रोल 114.79 पैसे दराने विकल्या जात आहे. तसेच डिझेलच्या दराचा सुध्दा भडका उडाला असून, डिझेल 97.44 पैसे प्रतिलिटर प्रमाणे परभणीकर खरेदी करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वर्षभरात पेट्रोल सुमारे 16 रुपयांनी महागले - विशेष म्हणजे गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात परभणीत पेट्रोलचे दर 99 रुपये 43 पैसे प्रति लिटर एवढे होते, तर ऑगस्ट महिन्यात 110.11 रुपये आणि नोव्हेंबर महिन्यात 113 रुपये 11 पैसे होते. त्यानंतर काही महिने भाव स्थिर राहिले. आता रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दरवाढ होताना दिसून येत आहे. त्यानुसार काल मंगळवारी 84 पैसे, तर आज बुधवारी देखील 84 पैशांची वाढ झाली असून, 114 रुपये 78 पैसे प्रति लिटर दराने पेट्रोल ग्राहकांना खरेदी करावे लागत आहे.
डिझेलमध्येही 8 रुपयांची वाढ - पेट्रोलने शंभरी केव्हाच ओलांडली आहे तर, आता डिझेल ही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. डिझेलमध्ये देखील गेल्या वर्षभरात तब्बल 8 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात परभणीत डिझेल 89 रुपये 11 पैसे, तर ऑगस्ट महिन्यात 97 रुपये 5 पैसे एवढ्या दराने विक्री झाले. त्यानंतर आत्तापर्यंत काहीसे स्थिर असणारे डिझेलचे दर पुन्हा भडकले आहेत. त्यानुसार काल मंगळवारी 83 पैश्यांची वाढ होऊन 96.61 पैसे एवढ्या दराने डिझेलची विक्री झाली, तर आज बुधवारी त्यात आणखी 83 पैशांची वाढ होऊन हाच दर 97 रुपये 44 पैसे एवढा झाला आहे.
सर्वाधिक दराचा परभणीकरांनाच फटका - झपाट्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दराचा सर्वाधिक फटका परभणीकरांना सहन करावा लागत आहे. यामुळे शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या भाववाढीचा अन्याय केवळ आमच्यावरच का ? असा सवाल देखील वाहनधारक उपस्थित करतात. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे. लोकांना आधीच रोजगार नाही, त्यात इंधन दरवाढीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहेत.
महागाईवर परिणाम - डिझेलच्या भावात वाढ होत असल्यामुळे मालवाहतूक महागली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाला व अन्नधान्यांची दरवाढ सुरू झाली आहे. तसेच बहुतांश प्रवासी गाड्या, मालवाहू ऑटोरिक्षा, टेम्पो, ट्रक डिझेलवर चालतात. त्यामुळे प्रवाशी वाहतुकीबरोबरच माल वाहतुकीचा खर्च देखील वाढला आहे. याचा प्रवास तसेच व्यापारावर देखील विपरीत परिणाम झाला आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.
परभणीतील सर्वाधिक दराचे हे आहे कारण - परभणी जिल्ह्याच्या जवळ इंधनाचा कुठलाही डेपो नाही. त्यामुळे जिह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपाना 330 किमी दूर असलेल्या मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपाना देखील सुमारे 300 किमी दूर असलेल्या सोलापूर येथून पुरवठा केला जातो. ज्यामुळे इंधनाच्या वाहतूकीवर मोठा खर्च होतो, ज्याची वसुली कंपन्या ग्राहकांकडून करतात. त्यामुळे परभणी परिसरात किंवा जवळ असलेल्या एखाद्या मोठ्या शहरात इंधनाचा डेपो उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळते.
हेही वाचा : Increase In Fuel Prices : इंधन दराचा भडका! सलग दुसऱ्या दिवशी 80 पैशांनी वाढ