परभणी - मराठवाड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मदत जमा करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. परभणीच्या कृषी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त कृषीमंत्री दादाजी भुसे परभणीत आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार डॉ.राहुल पाटील, कुलगुरू डॉ.अशोक ढवण आदी उपस्थित होते.
पीक विम्यासाठीही युद्धपातळीवर प्रयत्न
मंत्री भुसे म्हणाले, मराठवाड्यातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरडवाहू, बागायती पिके उधवस्त झाली आहेत. त्यामुळे या शेतकर्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत तसेच पीक विम्यापोटीची मदतही तत्काळ मिळण्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सर्व शेतकर्यांना दिवाळीपूर्वी निश्चितच बँक खात्यांमधून मदत जमा होईल, असा आशावाद भुसे यांनी व्यक्त केला.
क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध
दरम्यान, विद्यापीठातील काही जमीन क्रिडांगणासाठी उपलब्ध करुन दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. शहरासह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि क्रीडा क्षेत्रात करीयर करू इच्छिणाऱ्यांसाठी हे क्रीडांगण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
हे ही वाचा - ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी - भाजप आमदार मेघना बोर्डीकर