परभणी - गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. परभणीचे तापमान सुमारे ४४ ते ४५ अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचले आहे. सततच्या तापमानामुळे जमीन, इमारती तापल्या असून नागरिकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे परभणीकरांच्या जीवाची काहिली होत आहे.
आठ दिवसांपुर्वी मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार २० मे पासून परभणी तापलेलीच आहे. या तापमानात वाढ होत जाऊन गुरुवारी व शुक्रवारी तापमान सुमारे ४५ ते ४६ अंशावर पोहचले होते. तर शनिवारी देखील उष्णतेची तीव्रता कायम राहिली. तापमानात (४३.५) थोडीशी घट झाली. तरी शहरी भागात तापलेले डांबरी रस्ते आणि इमारतींमुळे वातावरणातील उष्णता कमी होत नाही. परिणामी, नागरिकांना अधिकच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
या प्रचंड तापमानामुळे नागरिक सकाळी ११ नंतर घराबाहेर पडताना दिसत नाहीत. दिवसभराच्या उष्णतेमुळे संध्याकाळनंतर बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. शहरात बाजारहटासाठी येणारी ग्रामीण भागातील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. तसेच दुसरीकडे प्रचंड तापमानामुळे ताप, खोकल्यासारखे साथीचे आजार बळावले आहेत. विशेषत: लहान मुलांना वाढत्या तापमानाचा सामना करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हामध्ये लहान मुलांना रूमाल बांधल्याशिवाय पाठवू नये, अंगावर सैल आणि कॉटनचे कपडे घालावेत. तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल्स वापरावेत. तसेच पाणीदार फळे जसे की टरबुज, अंगुर, खरबुज, काकडी शिवाय फळांचे ज्युस, सरबत आणि उसाचा रस नियमित सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत. दरम्यान, या उष्णतेचा आणखी दोन दिवस परिणाम राहण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.