परभणी - राज्यात उन्हाचा पारा वाढला असून परभणीच्या तापमानातही वाढ झाली आहे. सद्या उन्हाच्या तडाख्याने परभणीकर हैराण झाले आहेत. येणाऱ्या 3 दिवसात सूर्यनारायण आग ओकणार असून, परभणीचे तापमान 45 अंशाच्या अंशावर राहणार असल्याचा अंदाज, कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे.
पावसाळ्यात अवर्षणाचा सामना करणाऱ्या परभणीकरांना हिवाळ्यात बोचरी थंडी कायम सतावत असते. तर उन्हाळ्यात तापमानाच्या तीव्रतेचा देखील तेवढ्याच प्रकर्षाने सामना करावा लागतो लागतो. मात्र, मागील पंधरवड्यात तापमानात वाढ झाली आहे. यासंदर्भात बोलताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले की, 'संपूर्ण मराठवाड्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. मराठवाड्याचे तापमान 40 ते 45 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर परभणीत देखील येणाऱ्या 3 दिवसात 45 अंश एवढे तापमान राहणार आहे.
वाढत्या तापमानामुळे घराबाहेर पडताना परभणीकर डोक्याला रुमाल डोळ्याला गॉगल घालूनच घराबाहेर पडत आहेत. वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी रसवंती आणि ज्युस सेंटरची स्टॉल उपलब्ध आहेत. याशिवाय वाढत्या तापमानाचा फटका आरोग्याला बसला असून ताप, खोकला, सर्दी याप्रमाणेच उन्हाळी लागण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. शासकीय दवाखान्यासोबतच खाजगी दवाखाने देखील अशा रुग्णांनी 'फुल्ल' झाले आहेत.
नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये किंवा घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल, गॉगल आणि अंगभर कपडे घालून घालूनच बाहेर पडावे. रसयुक्त फळांचे सेवन करावे, जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच लिंबू शरबत वारंवार पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ञांकडून दिला जात आहे.