परभणी - एकीकडे राज्यात महसूल अधिकाऱ्यांवर वाळूमाफियांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. मात्र, त्याचवेळी परभणी जिल्ह्यातील पुर्णा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका टिप्परचालकाला चक्क मध्यरात्री पकडून त्याच्यावर पूर्णेच्या महिला तहसीलदारांनी कारवाई केली आहे. बुधवारी (दि. 18 डिसें) वाळू तस्कराला तब्बल 1 लाख 25 हजारांचा दंड देखील ठोठावला असून यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
ही कार्यवाही तहसीलदार पल्लवी टेमकर, नायब तहसीलदार श्रीनिकेतन वाळे यांनी केली आहे. पूर्णा तालुक्यातील कौडगाव-कान्हेगांव परिसरात मध्यरात्री वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार ते मंगळवारच्या मध्यरात्री पूर्णा-कौडगाव रस्त्यावर सापळा रचून बसले होते. रात्री 12.30 वाजता नदीपात्रातून वाळू उपसा करुन टिप्पर (क्र. एम एच 14 बि जे 2) पुर्णेकडे येत होता. तेव्हा तहसीलदार टेमकर यांच्यासह वाळे तसेच तलाठी अभिजीत पाटील, तलाठी राठोड यांनी या टिप्परला अडवले. लगेच पुर्णा पोलीसांनी संपर्क करून फौजदार चंद्रकांत पवार यांना घटनास्थळी बोलावून घेतले. हा टिप्पर त्यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. तर बुधवारी सकाळी महसूल विभागाच्या गौण खनिज कायद्यानुसार या वाहन धारकास 1 लाख 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार श्रीनिकेतन वाळे यांनी दिली.
हेही वाचा - परभणीत रस्त्यावर सोनं गोळा करायला नागरिकांची झुंबड...
दरम्यान, पुर्णा नदीकाठच्या कौडगाव, कान्हेगांव, सुकी, पिंपळगाव आदी गावात तराफ्याच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात आहे. याबाबत अनेक तक्रारी होत होत्या. मात्र, असा प्रकार होत नसल्याचे सांगत या कडे प्रशासन कानाडोळा करत होते. परंतु या कारवाईमुळे या भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा व चोरटी वाहतूक होत असल्याचे याच कार्यवाहीने सिद्ध झाले आहे.
हेही वाचा - परभणीत सत्ताधारी खासदारांचे महावितरणविरुद्ध आंदोलन; शेतकऱ्यांच्या रोहित्रांसाठी सेना आक्रमक