परभणी- उत्तर प्रदेशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीसह अटक करण्यात आली. याविरोधात परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशात घडलेल्या प्रकाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारून त्यानंतर छायाचित्राचे दहन करण्यात आले. तसेच, यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे बोलताना म्हणाले, उत्तर प्रदेशात गुंडाराज सुरू असून, त्या ठिकाणी ज्या महिलेच्या मुलीवर अत्याचार झाला, तिचे सांत्वन करण्यासाठी जाणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी आमानुषपणे कारवाई केली. याचा आम्ही निषेध करत आहोत.
योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत असल्याचे, इनामदार म्हणाले. आंदोलनात काँग्रेसचे परभणी तालुकाध्यक्ष पंजाब देशमुख, नागेश सोनपसारे, अकबर जहागीरदार, गणेश वाघमारे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा- विवेक रहाडेचे बलिदान व्यर्थ जाणार नाही - सकल मराठा समाज