परभणी - सततच्या दुष्काळामुळे आर्थिक तणावात असलेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील धारबा निरस असे शेतकऱ्याचे नाव आहे. हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या लग्नाची चिंता त्यांना भेडसावत होती. शेतात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.
जिल्ह्यात दुष्काळ पडल्याने शेतात पीक पाणी झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. यातच लग्नाला आलेल्या मुलींचे लग्न कसे करायचे? या तणावात असलेले पडेगाव येथील धारबा निरस (५२) गुरुवारी रात्री ८ वाजता घराबाहेर पडले. ते रात्री घरी परतलेच नाहीत.
त्यांचा शोध घेत असताना शुक्रवारी पडेगाव शिवारातील नंदकुमार निरस यांच्या शेतात त्यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजानन सैदाने, पो.ना. प्रल्हाद मुंडे, वसंतराव निळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी नवनाथ रामभाऊ निरस यांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात धारबा यांनी स्वतः जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे निरस यांनी म्हटले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे करत आहेत.