परभणी - जिंतूर तालुक्यातील बोरी-कौसडी रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनास्थळापासून फरार झालेल्या बसच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - परभणीच्या 'एटीएस'ची तीन भंगार विक्रेत्यांविरुद्ध कारवाई
अनिल तुकाराम सांगुळे (वय 16) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कौसडी येथील रहिवासी आहे. दरम्यान, परभणी-जिंतूर आगारातील मानव विकासची बस (क्रमांक एम.एच.22 बि.एल.3495) गुरुवारी सकाळी जिंतूरहून बोरी, कौसडी मार्गे मारवाडी या गावाकडे शाळकरी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात होती. कौसडी फाट्याजवळील एका धार्मिक शाळेसमोरून अनिल तुकाराम सांगुळे हा विद्यार्थी बोरी येथील शाळेत सायकलवर दप्तर घेऊन जात होता. तेव्हा या विद्यार्थ्यास बसने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - 'महापोर्टल'च्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार, परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सदर घटना घडताच बसचा ड्रायव्हर जागेवरून पळून गेला. या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बोरी शासकीय रुग्णालयात मृत विद्यार्थ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून या प्रकरणात बोरी पोलिसांत बसचालक नितीन गायकवाड याच्यावर 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.