परभणी : राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतरही नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसत असल्याने परभणीत शनिवारपासून पुढचे सहा दिवस आणखी कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. गुरूवारी संध्याकाळी उशीरा त्यांनी हे आदेश दिले आहेत.
गर्दी टाळण्यासाठी निर्णय
संचारबंदीतून सूट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांवर नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने ही दुकाने आणि आस्थापनाही शनिवारपासून सहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश यानुसार देण्यात आले आहेत. यानुसार बँकांमधील अंतर्गत कामे, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी यांचे बँक व्यवहार, कोरोना विषयक वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापनांचे व्यवहार, शासकीय चलन आदी कामकाज सुरू राहणार आहे. तर किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजी बाजार, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने १७ एप्रिल ते २२ एप्रिलदरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, मनपा आयुक्त, नगरपालिका व नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहेत.
काय सुरू
- कोरोना विषयक वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापनांचे व्यवहार
- बँकांमधील अंतर्गत कामे
- पेट्रोल पंप
- गॅस एजन्सी यांचे बँक व्यवहार
- शासकीय चलन आदी कामकाज
काय बंद
- किराणा सामान दुकाने
- भाजीपाला दुकाने
- भाजी बाजार
- फळ विक्रेते
- बेकरी
- मिठाई
- खाद्य दुकाने
जिल्ह्यात 12 मृत्यू, 676 बाधितांची वाढ
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून गेल्या 24 तासांत 676 बाधितांची वाढ झाली आहे. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांमध्ये व विलगीकरण केंद्रांमध्ये 5 हजार 435 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 591 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 23 हजार 502 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या. त्यापैकी 17 हजार 476 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. शिवाय आतापर्यंत 2 लाख 4 हजार 833 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले असून, त्यात 1 लाख 80 हजार 692 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले. तर 23 हजार 354 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह असून, 647 अनिर्णायक तर 140 नमुने नाकारण्यात आले आहेत.