परभणी - परभणी जिल्ह्यात केवल मार्च महिन्यात तब्बल साडे सहा हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, याचा ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे. तर दुसरीकडे अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. कोरोना हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची कमतरता असून सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी येत असल्याने आज (शुक्रवारी) आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शहरातील सर्वच कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, शल्य चिकित्सक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक डॉक्टरांची भरती करून रुग्णांना सर्व सुविधा देण्याच्या सूचना केल्या.
रुग्णांसह अधिकार्यांबरोबर चर्चा
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शुक्रवारी शहरातील सर्वच कोविड सेंटरला भेटी दिल्या. याठिकाणी रुग्णांसह अधिकार्यांबरोबर चर्चा केली. जिल्हा शासकीय रुग्णालय, अस्थिव्यंग शासकीय रुग्णालय, स्त्री रुग्णालय, आयटीआय कोविड सेंटर, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील कोविड सेंटरला आमदार पाटील यांनी सकाळपासून भेटी देण्याचा सपाटा लावला. सेंटरला भेटी देतेवेळी तेथील रुग्णांबरोबर, तसेच त्यांच्या कुटूंबियांबरोबर चर्चा केली. समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे व जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करीत त्या समस्या सुटाव्यात, यादृष्टीने निर्देशसुद्धा दिले.
'फिजीशियनच्या कमतरतेबद्दल तीव्र नाराजी'
या सेंटर्समधून रुग्णांना चांगल्या पध्दतीने चहा, पाण्यासह व जेवण मिळत असल्याबद्दल आमदार पाटील यांनी समाधान व्यक्त केले. परंतु शासकीय रुग्णालयाअंतर्गत कोविड सेंटर्समधून फिजीशियनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शहरात जवळपास 20 फिजीशियन आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करावी, त्यांच्या सेवा घ्याव्यात, असे स्पष्ट निर्देश देऊन आपणही या फिजीशियनसोबत चर्चा करू व नियमितपणे वैद्यकीय मिळण्याबाबत प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
'भौतिक सुविधाही उपलब्ध झाल्या पाहिजेत'
कोरोना रुग्णालयात 40 बेडमागे किमान 1 फिजीशियन, 4 एमबीबीएस व 4 बीएएमएस डॉक्टर निकषाप्रमाणे आवश्यक आहेत, असे निदर्शनास आणून डॉ. पाटील यांनी फिजीशियन असो की अन्य वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ यांच्या तात्काळ भरतीसंदर्भात जलदगतीने हालचाली कराव्यात, तोंडी मुलाखती घेऊन त्यांच्या सेवा उपलब्ध कराव्यात, कोणतीही हयगय करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील दोन मजल्यावर सुरू केलेल्या कोविड सेंटरमधून अन्य भौतिक सुविधाही उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे स्पष्ट करीत सद्यस्थितीत ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात आहे. परंतु भविष्यात तुटवडा जाणवल्यास जालना येथील फिलिंग सेंटरमधून ऑक्सीजन उपलब्ध करून घ्यावे, असे आमदार यांनी सांगितले.
'लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत'
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय झाले आहे. त्यामुळे त्यात अधिक गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करीत पाटील यांनी आरोग्य अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी जबाबदारीने, निष्ठेने व जलदगतीने सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरासह जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर आपण वरिष्ठ अधिकार्यांबरोबर सविस्तर चर्चा केली आहे. ग्रामीण भागात लसीकरण मोहीम आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व अन्य शासकीय रुग्णालयातून मोठ्या प्रमाणावर सुरू व्हावी, वेळप्रसंगी बेडकरिता जागा अपुरी पडत असल्यास आसपासच्या जिल्हा परिषद व खासगी शाळांच्या खोल्या ताब्यात घ्याव्यात. तेथील केंद्रांवरून लसीकरण मोहीम शंभर टक्के कशी यशस्वी होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असेही आपण प्रशासनाला सुचवल्याचे आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
'जिल्हा परिषदेत 600 बेड्सचे अद्ययावत रुग्णालय'
परभणी जिल्हा परिषदेसाठी स्टेडियम मैदानाजवळ 5 मजली भव्य इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन या इमारतीत तब्बल 600 बेड्सचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या जवळपास तीनशे खाटांवर रुग्ण असून, यामध्ये काही गंभीर तर काही सामान्य रुग्ण आहेत. याठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 'एएनएम'च्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आधी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यावेळी सांगितले.