परभणी - कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून घरात राहणे किंवा सार्वजनिक ठिकाणी 'सोशल-डिस्टन्स' चा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र याचा आरोग्य प्रशासनाकडूनच कशा पद्धतीने फज्जा उडाला आहे, याचे दुर्दैवी उदाहरण परभणीत पहावयास मिळत आहे. परराज्यात जाणाऱ्या व्यक्तींची आरोग्य प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे. मात्र, या गर्दीला कुठलीही शिस्त न लावता रुग्णालय प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे.
'कोरोना'च्या दहशतीमुळे देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र, अनेक पर्यटक, कामगार, विद्यार्थी आणि इतर व्यक्ती विविध ठिकाणी अडकले आहेत. त्या सर्वांना स्वगृही परतण्याची संधी शासनाने उपलब्ध केली आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी प्रत्येकाला आरोग्य तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील परभणीत अडकलेले नागरिक जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी करत आहेत. सकाळपासूनच भल्यामोठ्या रांगा याठिकाणी लागलेल्या दिसून येत आहेत. परभणी जिल्हा रुग्णालयाच्या अस्थिव्यंग रुग्णालयाच्या इमारतीत या लोकांच्या तपासण्या होऊन त्यांना आरोग्य प्रमाणपत्र दिल्या जात आहे. मात्र याठिकाणी झालेली गर्दी बेशिस्तीचा कळसच म्हणावा लागेल.
विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्या निगराणीत होत असलेल्या या प्रक्रियेतच सोशल-डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. नागरिकांनी एकमेकांमध्ये कुठलेही अंतर न ठेवता गर्दी केली आहे. जेवढी गर्दी इमारतीच्या बाहेर आहे, तेव्हढीच गर्दी इमारतीच्या आतमध्येही दिसून येते. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक असताना असा प्रकार होतो, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष देऊन आरोग्य विभागाला शिस्त लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.