परभणी - शिवसेनेने सत्तेत येऊनसुद्धा आपला संघर्ष कायम ठेवला आहे. परभणीत शेतकऱ्यांच्या रोहित्रांसाठी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेने वीज महावितरणच्या मुख्य कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. यावेळी खासदार संजय जाधव यांनी "हे आंदोलन शासनाच्या नव्हे तर मस्तवाल अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना रोहित्र मिळत नाही, त्यांच्या विजेचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आपण आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवू." अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
हेही वाचा -'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी', सोनिया गांधींची टीका
जिल्ह्यातील महावितरण कंपनीने जळालेल्या विद्युत रोहित्र (डीपी) देण्यास असमर्थता दर्शवित शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. जाधव म्हणाले, "सध्या रब्बी हंगामाची पेरणी चालू असून गहू, हरभरा, करडी आणि ज्वारी या पीकांसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु, परभणी जिल्ह्यात सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला आहे. यातच डीपीचे प्रश्नही वाढले आहेत. जिल्ह्यातील सर्व नद्यांना आणि शेतकऱ्यांच्या विहिरीत आणि बोअरमध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा पिकांना पाणी देता येत नाही. एक तर विद्युत पुरवठा नसतो आणि अनेक ठिकाणी डीपी जळालेल्या असतात. परंतु महावितरण कंपनीने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे.
यावेळी शेतकऱ्यांना नवीन जोडणीसाठी कोटेशन देणे पूर्ववत सुरू करावे, जळालेले व गावठाणचे डीपी रब्बी पीके घेण्यासाठी वेळेवर देण्यात यावेत. ग्रामीण भागातील व गावठाण भागातील अनेक गावे महिन्यापासून अंधारात आहेत, त्या गावांना अंधारमुक्त करण्यात यावे. अशी मागणी जाधव यांनी केली आहे. यावेळी अधीक्षक अभियंता बनसोडे यांनी स्वतः कार्यालयाबाहेर येऊन खासदारांचे निवेदन स्वीकारले. त्यांच्या मागण्यांवर तत्काळ कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा - 'अच्छे दिन'बद्दल विचारल्यावर तुमची बोबडी का वळते? ; युती तुटली म्हणजे आम्ही धर्मांतर केले नाही