परभणी - जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी तब्बल २७३ इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्राचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी ७ उमेदवारांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये गंगाखेड विधानसभेचे २ वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी अपक्ष आमदार सीताराम घनदाट यांचाही समावेश आहे.
परभणी मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ७ उमेदवारांमध्ये गोविंद (भैय्या) रामराव देशमुख पेडगावकर (अपक्ष), अॅड. अफजल बेगसहाब (अपक्ष), अब्दुल सत्तार अब्दुल अजीज शेख-इनामदार (अपक्ष), कौसडीकर निहाल अहेमद कौसडीकर खाजामियॉ (अपक्ष), शेख शकुर शेख ईस्माईल (अपक्ष) आणि गंगाखेड या मतदारसंघासाठी माजी अपक्ष आमदार सिताराम चिमाजी घनदाट (अपक्ष) या इच्छुकांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या समर्थकाला एमआयएमची उमेदावारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील असणारे नगरसेवक अली खान मोईन खान यांची परभणी मतदारसंघातून अचानक एमआयएमकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. वंचितसोबत असलेली युती तुटल्यानंतर 'एमआयएम' चा उमेदवार कोण असेल? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. ती आता संपुष्टात आली आहे. दरम्यान, अली खान हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून, त्यांच्या आक्रमकपणाची नेहमीच चर्चा होत असते. ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या गटातील असून त्यांच्या उमेदवारीमुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
मागच्यावेळी दिवंगत उपमहापौर सज्जू लाला यांनी निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे एमआयएमकडून लढण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु, वंचितसोबत झालेल्या आघाडीमुळे एमआयएमकडे मुस्लीम उमेदवार दुर्लक्ष करत होते. मात्र, वंचित आणि एमआयएमचा संसार तुटताच एमआयएमकडे उमेदवारीसाठी गर्दी झाली. याठिकाणी सत्ताधारी शिवसेनेला काँग्रेस, वंचितच्या उमेदवारासोबतच 'एमआयएम'च्या उमेदवारालाही टक्कर द्यावी लागणार असल्याने ही निवडणूक आता चौरंगी होणार हे निश्चित झाले आहे.
गंगाखेडची जागा सेनेला, भाजपच्या इच्छुकांचा बंडखोरीचा पावित्रा
गेल्या अनेक वर्षांपासून युतीच्या वाटाघाटीत भाजपच्या वाट्याला असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून अचानक शिवसेनेला उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या भाजप इच्छुकांचा प्रचंड हिरमोड झाला असून, हे सर्व इच्छुक बंडखोरीच्या पावित्र्यात दिसून येत आहेत. गंगाखेडच्या संत जनाबाई मंदिरात या भाजप पदाधिकाऱ्यांनी आज आत्मक्लेष करत भजन आंदोलन केले.
राज्यातील भाजप सेनेची युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेने गंगाखेड विधानसभेची उमेदवारी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना जाहीर केली. गेल्या 40 वर्षांपासून युतीच्या वाटाघाटी जिल्ह्यातील एकमेव गंगाखेडची जागा भाजपला मिळते. परंतु, यावेळी ती शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात अंतर्गत भाजपच्या इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे इच्छुक उमेदवार तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे, बाजार समिती सभापती बालाजी देसाई, माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. सुभाष कदम हे सहा जण उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. या सर्वांनी भाजपच्या तळागाळातील पदाधिकाऱ्यांपासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच उमेदवारीसाठी गळ घातली. विशेष म्हणजे 'आमच्या पैकी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्याचा एक दिलाने प्रचार करू', असा विश्वासही त्यांनी वरिष्ठांना दिला होता; परंतु, प्रत्यक्षात मात्र युतीत खासदार संजय जाधव समर्थक शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासाठी गंगाखेडची जागा सोडण्यात आली.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलेला हा पावित्र म्हणजे एक प्रकारे बंडखोरी आहे. येणाऱ्या काही दिवसात प्रचाराची रणधुमाळी चालू होईल. त्यात गंगाखेडचे भाजप पदाधिकारी काय भूमिका घेतात. यावर विजयाचे गणित अवलंबून आहे, हे मात्र नक्की.