परभणी - येथील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोरील एटीएम आणि सीडीएम मशिन असलेला संपूर्ण गाळा 4 डिसेंबर रोजी आग लागल्याने जळून खाक झाला होता. परंतु, ही आग शॉर्टसर्किटने नव्हे तर एका तरुणाने बँकेवरील रागाच्या भरात पेट्रोल टाकून लावल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या तरूणासह अन्य एकाला अटक केली असून दोघांनाही आज (शुक्रवारी) न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा- एन्काऊंटरच्या समर्थनात महिलांच्या सुरक्षेच्या उणिवा झाकल्या जाऊ नयेत - नीलम गोऱ्हे
शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीपुढे भारतीय स्टेट बँकेची मुख्य शाखा आहे. बाहेरच्या बाजूला एटीएम आणि सिडीयम मशिन असलेला एक गाळा आहे. त्या ठिकाणी एटीएमच्या दोन व एक सिडीएम मशिन ठेवण्यात आलेली आहे. बुधवारी (4 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास ही आग लागली. इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग भडकली असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. आगीचे लोट एटीएम मशिनच्या दरवाजाबाहेर आल्याने एटीएम मशिन तसेच सीडीएम मशिन देखील जळून खाक झाली. सकाळी या रस्त्याने जाणार्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या साहाय्याने जवानांनी ही आग आटोक्यात आणली होती.
परंतु, ही आग शॉर्टसर्किटने नव्हे तर एका व्यक्तीने बँकेवरील रागाच्या भरात पेट्रोल टाकून लावल्याचे पोलीस तपासात उघड झाले. नंदकुमार गोपाळराव पुरी (वय 26 रा.संजय नगर बोरी) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने 1 डिसेंबर रोजी सदर बँकेच्या एटीएम मशिनमध्ये 1 लाख 44 हजार रुपये जमा केले होते. परंतु, त्यावेळी त्याला पावती मिळाली नाही. तसेच या जमा पैशाचा मेसेज देखील मिळत नसल्याने त्याने बँकेकडे तक्रार केली. बँकेच्या व्यवस्थापकांनी त्याला अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने सलग तीन दिवस बँकेत चकरा मारल्या. परंतु, बँक व्यवस्थापकांनी त्याला दाद दिली नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष केले. याच रागातून त्याने बुधवारी (4 डिसेंबर) पहाटे 2.30 वाजता पेट्रोल टाकून संपूर्ण एटीएम मशिन आणि सीडीएम मशिनचा गाळा पेटवून दिला, अशी माहिती नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरिक्षक रामेश्वर तट यांनी दिली आहे. हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे.
दरम्यान, नंदकिशोर पुरी याच्यासह त्याचा मित्र तथा बोरी येथील स्टोनक्रेशरचा मालक गोविंद रामेश्वर अंभोरे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही आज (शुक्रवारी) परभणी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी देखील माहिती तट यांनी दिली.
आगीत झालेले नुकसान अजूनही अस्पष्ट
दरम्यान, या आगीमध्ये दोन एटीएम आणि एक पैसे भरण्याची मशिन जळून खाक झाली. परंतु, यामध्ये नेमके किती रुपये व इतर साहित्य जळाले, हे अजूनही अस्पष्ट आहे. तर बँकेकडून मशिनमध्ये 23 लाख रुपये भरले होते, असे सांगण्यात आलेले होते. मात्र, त्यापैकी किती रुपये जळाले, हे मशिन उघडत नसल्याने कळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.