परभणी - जिल्ह्यातील काँग्रेसचे जुने आणि निष्ठावान असलेल्या जामकर घराण्याचे वारसदार संग्राम जामकर यांनी काल (रविवारी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. संग्राम हे माजी मंत्री दिवंगत रावसाहेब जामकर यांचे नातू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते बाळासाहेब जामकर यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या सेना प्रवेशामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची अंतर्गत राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे सांगण्यात येते.
जामकर यांचे घराणे मराठवाड्यातील जून्या राजकीय घराण्यापैकी एक आहे. आजही जिल्ह्याच्या राजकारणात जामकर घराण्याचे नाव घेतले जाते. रावसाहेब जामकर हयातीत असे पर्यंत हे घराणे काँग्रेस विचारसरणीशी एकनिष्ठ राहिले. परंतु, कालांतराने रावसाहेब जामकर यांचे चिरंजीव बाळासाहेब जामकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीसाठी बाळासाहेब जामकर हे इच्छुक होते. परंतु, त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. तेव्हापासून ते पक्षकार्यापासून दुरावले. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी घरगुती कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. दरम्यान, जामकर घराण्यातील तिसऱ्या पिढीतील संग्राम जामकर यांचे युवकांमध्ये वलय आहे. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपासून राजकारणात प्रवेश केला. परंतु तेथे त्यांना यश आले नाही. 2014 च्या निवडणूक झाल्यानंतर काही महिण्यात संग्राम जामकर परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या सातत्याने संपर्कात होते. आमदार पाटील व जामकर घराण्याचे नाते संबंध देखील आहे. त्यामुळे संग्राम जामकर शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगत होतीच. अखेर 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संग्राम जामकर यांनी काल (रविवार) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तसेच यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद देशमुख यांनीही शिवबंधन बांधून प्रवेश घेतला.
हेही वाचा - परभणीतील जामकर घरण्याचे वारसदार सेनेत दाखल
दरम्यान, जामकर, देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील काही महत्वाचे घराणे शिवसेनेत येत असल्याने शिवसेनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या राजकीय समिकरणांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार, हे मात्र निश्चित.