परभणी - जिल्ह्यातील जिंतूर शहरात क्वॉरंटाइन केलेल्या कुटुंबीयांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना आज (रविवारी) उघडकीस आली. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील माल लंपास केला. मात्र, कुटुंबीय क्वॉरंटाइनमध्ये असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला याची माहिती अजूनपर्यंत पुढे आली नाही.
कोरोनामुळे क्वॉरंटाइन झालेल्या कुटुंबांच्या घरांवर चोरटे पाळत ठेवून असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. यापूर्वी परभणी शहरातील स्टेशन रोडवरील एका कुटुंबाच्या घरात असाच चोरट्यांनी हात साफ केला होता. त्यानंतर शहरातील गजानन नगरात क्वॉरंटाइन झालेल्या कुटुंबाच्या घरातील सुमारे दीड लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवरदेखील चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना 19 ऑगस्टला उघडकीस आली.
या दोन्ही प्रकरणी परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटना ताज्या असतानाच जिंतूरच्या शिवाजी नगरात घडलेल्या या चोरीमुळे जिंतुरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाजी नगरातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य विभागाने त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे घरास कुलूप होते. नेमके याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी रात्री घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला. हा चोरीचा प्रकार आज (रविवारी) उघडकीस आला. शेजार्यांनी खिडकीचे ग्रील तुटल्याचे पाहताच पोलिसांना घटनेची माहिती दिली.
त्यानंतर जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ, पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळली भेट देवून पाहणी केली. तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त झाल्याचे दिसले. त्यामुळे शिवाय श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते; परंतु घरातील सर्वच सदस्य क्वारंटाइन असल्याने दुपारपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही घरी आले नव्हते. त्यामुळे या घरफोडीत नेमका कोणता आणि किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला याबाबत पोलिसांनाही माहिती मिळाली नाही, तर घरची मंडळी आल्यानंतर पंचनामा होईल आणि त्यानंतरच चोरीला गेलेल्या मालाची माहिती कळू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.