परभणी - शहरासह जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच परभणी शहराजवळून वाहणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्यातचे पाणी शहरात शिरल्याने शेकडो घरातील संसार पाण्यात वाहून गेला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आल्याने रस्ते वाहून गेले. ज्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला होता. एकूणच या पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार उडाल्याचे पाहावयास मिळाले.
परभणी शहर आणि परिसरात 232 मिलिमीटर पावसाची नोंद -
विशेषतः हा पाऊस परभणी शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पडला. सुुमारे 8 ते 10 तास झालेल्या या पावसाची मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात तब्बल 232 मिलिमीटर एवढी नोंद आज (सोमवारी) सकाळी 7 वाजता घेण्यात आली. ज्यामुुुळे ही अतिवृष्टी नव्हे तर ढगफुटी होती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, या पावसामुळे परभणी शहरातील गुजरी बाजार, गांधीपार्क, क्रांतीचौक, नारायण चाळ, बस स्टैंड रोड, वसमत रोडवरील शंकर नगर, रामकृष्ण नगर तेथून जागृती, एकता व समता या वसाहती तसेच खानापूर नाका आणि दत्तधाम परिसरातील सर्व वसाहतीतील रस्ते जलमय झाले होते.
डाव्या कालव्याचे पाणी शेकडो घरांमध्ये -शहरातील आशीर्वादनगरजवळ जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पूल बांधण्यात येत आहे. ज्यामुळे या कालव्याचे पाणी दोन बंधारे बांधून अडविण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत झालेल्या तुफान पावसामुळे हा कालवा रात्री 8.30 च्या सुमारास ओव्हरफ्लो झाला. ज्याचे पाणी परिसरातील शेकडो घरांमध्ये तर शिरलेच त्यानंतर हे पाणी समाधान नगर, शिवराम नगर मार्गे वसमत रोडवर गेल्याने सुमारे अर्धे शहर पाण्याखाली आले होते. ज्यामुळे महानगरपालिका, अग्निशामक दल व पोलीस प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीनी जेसीबी मशीन लावून या कालव्यावरील बंधारे फोडून पाण्यास वाट करून दिली. त्यामुळे या कालव्या लगतच्या वसाहतीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळी आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, स्थानिक नगरसेवक रितेश जैन, चंदू शिंदे, रवि सोनकांबळे आदींनी धाव घेऊन नागरिकांना दिलासा दिला.
पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला शहरातील अन्य भागातील वस्त्यांमध्येही पाणी -दरम्यान, गंगाखेड रोडवरील पिंगळगड नाल्याला पूर आल्याने हे पाणी साखला प्लॉट, परसावतनगर आदी भागातील वस्त्यांमध्ये शिरले. तसेच गंगाखेड रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परभणी गंगाखेड महामार्ग मध्यरात्रीपर्यंत बंद होता. तर डाव्या कालव्याचे पाणी शिरल्याने जिंतूर रस्त्यावरील दर्गा रोड, जुना पेडगाव रोड, विसावा कॉर्नर परिसरातील वसाहती व झोपडपट्टी भागातील सखल भाग जलमय झाला होता. यातच शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा दुपारपासूनच खंडीत झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. रात्री उशिरापर्यंत अनेक भागात वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.
वसमत रस्त्यावर गुडघाभर पाणी; वाहतूक ठप्प-प्रचंड प्रमाणात पडलेला पाऊस आणि कालव्याचे पाणी शहरात शिरल्याने वसमत रस्ता पाण्याने पुर्णतः जलमय झाला होता. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघ्या एवढे पाणी साचले होते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. या पाण्यातून मोठी कसरती करत नागरिकांना मार्ग काढावा लागत होता. महत्त्वाचे म्हणजे नालेसफाई नसल्याने नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे कित्येक तास हे पाणी रस्त्यावर साचून राहिले. त्यामुळे वसमत रस्त्यावरील चिंतामणी मंदिरासमोरचा दुभाजक फोडून मनपा कर्मचाऱ्यांनी हे पाणी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वळवले. परंतु सदर भागात साचलेल्या पाण्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.
परभणी रेल्वे आणि बस स्थानक पाण्याखाली; बेंगलोर एक्सप्रेस खोळंबली - परभणी रेल्वे स्थानकावरील रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे पोखर्णी स्थानकावर बेंगलोर एक्सप्रेस दीड तास अडकून पडली होती. अन्य देखील गाड्या देखील उशिराने धावू लागल्या. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. या प्रमाणेच बस स्थानकाच्या शेजारून वाहणाऱ्या मोठा नाल्याला प्रचंड प्रमाणात पूर आला. परिणामी परिसरात पाणीच पाणी झाले होते. सखल भागातील दुकानांमध्ये हे पाणी शिरले. तसेच एसटी कॉलनीलगतच्या भागातील घराघरांमध्ये देखील हे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले. त्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली. या ठिकाणी देखील महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाने धाव घेऊन नागरिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलविले. महत्त्वाचे म्हणजे रविवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनसोबत सामाजिक कार्यकर्ते युध्दपातळीवर मदत कार्यात गुंतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
परभणी-ताडकळस मार्ग बंद -परभणी-ताडकळस या मार्गावर बलसा या ठिकाणच्या नदीवरील पुलावरून चार फूट उंच पाणी वाहत असल्याने रविवारी सायंकाळपासून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला होता. त्यामुळे ताडकळस तेथून पुढे पालमकडे जाणारी वाहन अडकून पडली. या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला ५० फुटापर्यंत रस्त्यावर पाणी वाहत होते. मध्य रात्रीपर्यंत यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पहाटेच्या सुमारास हे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती.
पुरात अडकलेल्या व्यक्तीची मध्यरात्री बोटीतून सुटका -परभणी तालुक्यातील पिंगळीच्या पुढे मिरखेलजवळ पुरात अडकलेल्या 6 पुरुष, 5 महिला आणि 10 बकऱ्यांची जिल्हा प्रशासनाने अन्य यंत्रणांच्या मदतीने सोमवारी मध्यरात्री सुटका केली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, सहायक पोलिस निरीक्षक बनसोडे, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी पवन खांडके, मंडळ अधिकारी पक्वान्ने, अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांसह काही कोतवालांनी या सर्वांना सुखरूपपणे बोटीने बाहेर काढले. हे रेस्क्यू ऑपरेशन रात्री 8 ते पहाटे 2 वाजेपर्यंत चालले.
कोवळ्या पिकांना फटका बसण्याची शक्यतादरम्यान, प्रचंड प्रमाणात पडलेल्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तशीच परिस्थिती ग्रामीण भागातील शेतांमध्ये देखील दिसून आली. अनेक सखल भागातील शेतांना नदीचे स्वरूप आले होते. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने त्याठिकाणची कोवळी पिके आता सडण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने उघडीप न दिल्यास हे साचलेले पाणी पिकांसाठी धोकादायक ठरण्याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे.