परभणी - जिल्ह्यातील सेलू बसस्थानकात वारंवार मुलांकडून काढल्या जाणाऱ्या छेडछाडीला वैतागलेल्या एका तरुणीने पायातली चप्पल काढून एका रोडरोमिओला चांगला चोप दिला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, त्या मुलीचा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
हेही वाचा - शिरुरमध्ये महाविद्यालयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण
परभणी जिल्हातील सेलू येथे जवळपासच्या गावातील मुली महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. मात्र, काही टवाळखोर मुलांकडून त्यांची सेलू बसस्थानकावर छेड काढण्यात येत होती. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत होता. यामुळे अनेक मुली त्रस्त झाल्या होत्या. या रोडरोमियोंना आवरण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नव्हते. त्यामुळे आज एका धाडशी मुलीने नेहमी छेडछाड करणाऱ्या तरुणाला पायातील चप्पल काढून चक्क बदडायला सुरुवात केली. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे या मुलीच्या धडसाबद्दल तिचा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्कार केला. दरम्यान, या रोडरोमिओला उपस्थित इतर तरुणांनी ही चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर काही लोकांनी त्याला पोलिसांच्या हवाली करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला समज देवून सोडून देण्यात आले.