परभणी - जिल्ह्यातील 19 रुग्ण आज शुक्रवारी कोरोनामुक्त झाले असून, त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. शिवाय आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 18 अहवाल निगेटिव्ह आहेत. विशेष म्हणजे आज एकही अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. एकूणच कोरोनाच्या बाबतीत आजचा दिवस परभणी जिल्ह्यासाठी दिलासा देणारा ठरला आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 89 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी 50 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. तर दोघाचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 37 जणांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर परभणी जिल्हा हा सुरुवातीचे दीड महिने ग्रीनझोन मध्ये होता. त्यानंतर एक रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना राबवत कोरोनावर नियंत्रण मिळवले होते; परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाली. ज्यामुळे पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या रेड झोनमधून जिल्ह्यात नागरिकांचे लोंढे दाखल झाले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात आजपर्यंत 89 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या पंधरा दिवसात दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली; मात्र गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा दिलासाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसात केवळ एकदाच तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सध्या निगेटिव्ह अहवाल येणार्यांची संख्या मोठी असून, त्यातल्या त्यात कोरोनाबाधितांना सुट्टी मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला एक त्यानंतर एकदम 24 रुग्णांना सुट्टी देण्यात आली होती. तर आज शुक्रवारी पुन्हा 19 रुग्णांना कोरोना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ज्यामध्ये परभणी शहरातील मातोश्री नगरातील दोन, नागसेन नगर येथील एक, त्रिमूर्ती नगरातील दोन आणि ईटलापुर मोहल्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. याप्रमाणेच परभणी तालुक्यातील कारेगाव येथील दोन रुग्णांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यातील नागठाणा 4, माखणी 4 आणि मैराळ सावंगी या ठिकाणच्या एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली आहे. याखेरीज पूर्णा तालुक्यातील कमलापूरचा 28 वर्षीय तरुण देखील ठणठणीत बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 635 रुग्णांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 318 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत, तर 89 अहवाल पॉझिटिव्ह असून, सद्यपरिस्थितीत 117 स्वॅबचा अहवाल नांदेडच्या प्रयोगशाळेत प्रलंबित आहे. या प्रमाणेच 77 स्वॅबचा अहवाल अनिर्णायक तर 34 अहवालांची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच परभणीतील संसर्गजन्य कक्षामध्ये सध्या 195 रुग्ण दाखल असून 437 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी 1 हजार 836 रूग्णांनी अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला असून, त्यामध्ये परदेशातून आलेले 62 आणि त्यांच्या संपर्कातील 6 जणांचा समावेश आहे.
सध्या 89 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 50 जणांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली असून, दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित 37 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.