परभणी - जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री ४ तासात तब्बल १८६.२ मिमी पाऊस पडल्याचा दावा भारतीय हवामान खात्याने केला आहे. तर याच दिवशी आणि या वेळेतच ८५ मिमी पावसाची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. याहूनही विशेष म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने याच वेळेत ५८.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. त्यामुळे नेमका खरा आकडा कोणाचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, तिन्ही यंत्रणा शासकीय असल्या तरी त्यांच्यापैकी कोणाता आकडा खरा आहे, याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी पाच अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात पाऊस मोजण्यासाठी शासनाची विविध पातळीवर व्यवस्था असते. याच पावसाच्या आकडेवारीवर पेरणी आणि पुढे दुष्काळ, पीकविमा याबाबतचे शासकीय धोरण ठरत असते. परंतू परभणीत पहिल्याच पावसाच्या आकडेवारीने मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खाते, महसूल विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिलेल्या आकड्यांमुळे गोंधळ उडाला आहे. त्यामुळे नेमका किती पाऊस पडला याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ५ सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीत भारतीय हवामान खात्यातील एका अधिकाऱ्यासह अन्य ५ जणांचा समावेश आहे. ही समिती २ दिवसात या पावसाचा शोध घेऊन अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर नेमकी कुठली आकडेवारी खरी आहे, स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरात भारतीय हवामान खात्याची वेधशाळा आहे. त्या ठिकाणी १२ जूनच्या मध्यरात्री १ ते ५ या ४ तासात १८६.२ मिमी एवढा पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर या ठिकाणाहून साधारण दीड किलोमीटरवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. जिथे महसूल विभागाचे पर्जन्यमापक आहे. तेथे मात्र ८५ मिमी आणि जिल्हाधिकारी कार्यालयपासून तीन किलोमीटरवर कृषी विद्यापीठाची वेधशाळा असून या ठिकाणी ५८.८ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांना या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, परभणी कृषी विद्यापीठ, भारतीय हवामान विभाग आणि महसूल या तीनही यंत्रणा मार्फत मोजल्या जाणाऱ्या पावसामध्ये तफावत आली आहे. विशेष म्हणजे हा मान्सूनपूर्व पाऊस होता. आता मान्सूनच्या पावसाला सर्वत्र सुरुवात झाली आहे. हा पाऊस सर्वत्र सारख्या प्रमाणात पडतो. यावर्षीचा मान्सून अगदी नॉर्मल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमके काय पेरावे, कुठल्या भागात कुठले पीक घ्यावीत, यासाठी पाऊस मोजणारे यंत्र ठिकठिकाणी उभे करणे आवश्यक आहे. या यंत्रणांची कमतरता असल्याने अशा प्रकारची तफावत निर्माण होते. त्यामुळे कमी जास्त पाऊस पडला, यामध्ये न जाता जास्तीत जास्त यंत्रणा उभ्या कराव्यात, अशी अपेक्षा डॉ. डाखोरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच पावसावरच खरीप व रब्बी पिकाचे नियोजन असते. पाऊस चांगला असेल तर शेतकरी तशा प्रकारची पिके घेतो. खरिपात सोयाबीन, कापूस तर रब्बीत हरबरा पीक घेतो. जर पाऊस कमी असेल तर पिकात अंतरपीक घेतो. त्यामुळे या पावसाच्या अंदाजाचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होत असतो, असेही ते म्हणाले.
'मी आत्महत्या करणार नाही' या अभियानाचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम यांनी या भोंगळ कारभारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या हवामान खात्याची अवस्था 'आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं' अशी झाली आहे. शासनाकडून अशा प्रकारचे पांढरे हत्ती पाळण्यात येत आहेत. शासनाचे हवामान खाते शेतकऱ्यांची नेहमीच हेटाळणी करत आले आहे. हे दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने सिद्ध केले आहे. एकाच दिवशी पडलेल्या पावसात एवढी तफावत येतेच कशी ? असा सवाल उपस्थित करत माणिक कदम यांनी शासनाच्या हवामान खात्याला धारेवर धरले. तर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रशासनाने समिती देखील स्थापन केली. त्या समितीत शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असायला हवा, अशी मागणी देखील कदम यांनी केली आहे.