परभणी - कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत गोरगरिबांपर्यंत मदत पोहोचवण्याऐवजी परभणीच्या तहसील कार्यालयात बसून काही खासगी लोकांनी तब्बल 800 बनावट शिधापत्रिका तयार केल्या आहेत. यात तहसीलमधील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणी अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी. तसेच संपूर्ण प्रकरणाची 'सीआयडी' मार्फत चौकशी करावी, अशी मागणी परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे.
याप्रकरणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. शिवाय महसूलमंत्र्यांना देखील या प्रकरणी चौकशी करावी, असे निवेदन पाठवले आहे. तसेच आपण जिल्हाधिकाऱ्यांना देखील कडक कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्याचे आमदार डॉ.राहुल पाटील म्हणाले.
दरम्यान, कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यांना दोन वेळचे अन्नधान्य देण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. दुसरीकडे एका नगरसेवकाच्या मुलाने तहसीलमध्ये बसून तब्बल 800 बोगस शिधापत्रिका तयार करुन घेत धान्य वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खासदार संजय जाधव यांनी सर्वप्रथम या प्रकरणी तहसीलदारांची तक्रार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली केली होती. हा प्रकार 24 एप्रिलच्या रात्री घडला.
या प्रकारचा फोटो आणि माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठवण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी एका उपजिल्हाधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. या संदर्भात आज रविवारी आमदार डॉ.पाटील यांनी यापूर्वी तहसीलमधून असे बनावट आणि बोगस शिधापत्रिका किती दिल्या. शिवाय आतापर्यंत अन्य प्रमाणपत्रे किती दिली आहेत, याचीही चौकशी आता व्हायला पाहिजे आणि ही चौकशी होईपर्यंत अधिकाऱ्यांना निलंबित करावे. तसेच शासकीय कार्यालय असलेल्या तहसीलमध्ये खासगी लोक येतातच कसे, आणि रात्रीच्या वेळी ते त्या ठिकाणचे संगणक कसे काय हाताळू शकतात? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकारात तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. ते देखील दोषी आहेत. त्यामुळे याप्रकरणी कारवाई झालीच पाहिजे, असेही आमदार पाटील म्हणाले.
कॅम्पच्या माध्यमातून आलेल्या अर्जानुसार 'त्या' शिधापत्रिका तयार होत होत्या - तहसीलदार कडवकर
मागच्या काही महिन्यांमध्ये विविध कॅम्पच्या माध्यमातून आलेल्या अर्जानुसार तहसील कार्यालयात शिधापत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित नगरसेवकाचा मुलगा त्या ठिकाणी आला होता. या ठिकाणी कुठल्याही बोगस शिधापत्रिका तयार होत नव्हत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे चौकशीअंती सत्य बाहेर येईलच. मात्र, माझ्यावर गैरसमजुतीतून आणि आकसापोटी लोकप्रतिनिधी आरोप करत असल्याचेही तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी 'ईटीव्ही भारत' च्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवरून बोलताना सांगितले.