परभणी - जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री मान्सूनपूर्व पाऊस बरसला. या पावसामुळे जिल्ह्यातील मानवत, सेलू, जिंतूरच्या काही भागात किरकोळ नुकसान झाले. मात्र, गेल्या अनेक दिवसांच्या उष्ण तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासाही मिळाला आहे. तर आज (सोमवारी) देखील ढगाळ वातावरण असून दिवसभरात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा- 'द क्रू ड्रॅगन' अंतराळयान यशस्वी पोहोचले अंतराळ स्थानकात
रविवारी अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणाने सूर्य झाकोळून गेला होता. तर, मध्यरात्री पाऊस बरसला. या पावसाची सर्वाधिक नोंद पाथरी तालुक्यात 42.33 मिमी झाली असून एकूण जिल्ह्यात सरासरीच्या 17.21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात तब्बल 45 अंश तापमानाचा सामना नागरिकांना करावा लागला. मात्र, गेल्या चार दिवसांत तापमानात घट होऊन ढगाळ वातावरण आहे. त्यातच जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच रविवारी रात्री उशिरा जिल्ह्यात सर्वत्र रोहिणी नक्षत्रातील पाऊस बरसला. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात झाला असून त्यात सर्वाधिक पावसाची नोंद पाथरी तालुक्यात 42.33 मिलिमीटर एवढी झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस जिंतूर तालुक्यात 6.13 मिलिमीटर झाली आहे. याप्रमाणेच परभणी तालुक्यात 14.13 तर पालम 17, पूर्णा 17, गंगाखेड 17, सोनपेठ 9, सेलू 19.8 आणि मानवत तालुक्यात 12.67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तसेच जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात वादळी वाऱ्याने काही घरांवरील पत्रे उडाले. सेलू तालुक्यात देखील वीस मिनिटे जोरदार पडलेल्या पावसाने शेतातील आखाड्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, वालूर येथे वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेवरील तसेच काही घरांवरील पत्रे उडाली असून काही ग्रामस्थांना किरकोळ मार लागला आहे. या पावसात मानवत तालुक्यात रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याप्रमाणेच परभणी, गंगाखेड, पालम, पूर्ण तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत देखील वीजपुरवठा खंडित झाला होता. मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील केशरताई भिसे यांच्या शेतातील रेशीम शेड कोसळून 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. सोमवारी देखील जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण दिसून येत असून दिवसभरात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.