परभणी - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे वास्तव पुढे आले आहे. जिंतूर तालुक्यातील बेलोरा येथील करपरा नदीवर पूल नसल्याने पात्रातून जीवघेणा प्रवास करणारे ग्रामस्थ असो किंवा पिंपराळा येथे रस्त्याअभावी आजीला पाठीवर घेऊन जिंतूर गाठणारा नातू असो, या प्रकारांमुळे रस्त्यांची दुरवस्था दिसून आली आहे. विशेष म्हणजे अशा खराब रस्त्यांचा फटका परभणीच्या जिल्हाधिकार्यांना देखील बसला आहे. पालम तालुक्यात खरीप पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकार्यांना चक्क बैलगाडीत बसून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करावी लागली.
जिंतूर तालुक्यातील बेलोरा येथील करपरा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना नदीच्या पात्रातून जाऊन तालुका गाठावा लागतो. या नदीच्या पात्रातून तब्बल आठ महिने पाणी वाहते. त्यामुळे या ठिकाणच्या ग्रामस्थांना नेहमीच जीवघेणा प्रवास करावा लागतो. शिवाय नदीला पूर आल्यानंतर जेसीबीत बसून हे पात्र ओलांडावे लागते. अशीच परिस्थिती जिंतूर तालुक्यातीलच पिंपराळा या गावची देखील आहे. या गावातून जिंतूरकडे जाणाऱ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात चिखल साचल्याने वाहन जात नव्हते. परिणामी शनिवारी एका नातवाने आपल्या आजीला पाठीवर बसवून पायपीट करत जिंतूरचा दवाखाना गाठला. या दोन्ही प्रकारांमुळे रस्त्यांचे वास्तव पुढे आले आहे. या खराब रस्त्यांचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच बसतो असे नाही, तर स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना देखील खराब रस्त्यांचा फटका बसला आहे. रविवारी पालम तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकार्यांना चक्क बैलगाडीत बसून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करावी लागली.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे हे पालम तालुक्यातील रावराजुर परिसरात मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या खरिपाच्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र रस्त्यावर गुडघाभर पाणी आणि चिखल साचल्याने त्यातून सरकारी मोटार गाड्या जात नव्हत्या. शिवाय पायी चालणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे या दोघांनाही गावकऱ्यांनी बैलगाडीत बसवून नुकसान झालेल्या शेतापर्यंत पोहोचवले. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची तळमळ ओळखून बैलगाडीत बसून पिकांची पाहणी केली. सोबतच त्यांना देखील ग्रामीण भागातील रस्त्यांचे वास्तव लक्षात आले. हे शेत शिवारातील रस्ते असले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाला तालुक्याशी व जिल्ह्याशी जोडणाऱ्या रस्त्यांची देखील अशाच प्रकारे दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या रस्त्यांवर लक्ष देऊन दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.