परभणी - परभणी लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे. यावेळी फक्त ६३.१९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत ६४.४४ टक्के मतदान झाले होते. यंदा जवळपास सव्वा टक्क्यांनी मतदानामध्ये घट झाली असून ही घट कुणाच्या पथ्थ्यावर पडणार हे येत्या २३ मे रोजी कळणार आहे.
परभणीत परतूर मतदारसंघात सर्वाधिक ६६.८९ टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी ३ लाख ४९ हजार ९३० मतदारांपैकी २ लाख ३४ हजार ८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात कमी मतदान झालेल्या परतूरमध्ये २ लाख ९२ हजार ६२९ पैकी १ लाख ७४ हजार १२२ मतदारांनी मतदान केले. याशिवाय जिंतुरामधील ३ लाख ४७ हजार ९५९ मतदारांपैकी २ लाख २० हजार ८५८ आणि परभणीत ३ लाख १२ हजार ८ मतदारांपैकी १ लाख ९० हजार ५७६ जणांनी मतदान केले.
गंगाखेडमध्ये ३ लाख ८५ हजार ११४ पैकी २ लाख ४४ हजार ७१ जणांनी मतदान केले. घनसावंगी मतदारसंघात ३ लाख ७ हजार ६२ पैकी १ लाख ८९ हजार ९०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय इतर १० मतदारांपैकी जिंतूर आणि गंगाखेडमध्ये प्रत्येकी एक मतदान नोंदवण्यात आले आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ६ विधानसभासंघात गुरुवारी मतदान पार पडले. यंदा २०१४ च्या तुलनेत कमी तापमानामुळे मतदान वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. गेल्या निवडणुकीवेळी परभणी जिल्ह्याचे तापमान ४३ ते ४४ डिग्री सेल्सिअस होते. यावेळी कमाल तापमान केवळ ३८ डिग्री सेल्सिअस होते. तसेच शिवाय मतदान वाढवण्यासाठी प्रशासनानेही जोरदार जनजागृती केली होती. मात्र, यंदा मतदानाचा टक्का घसरल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हा कमी झालेला मतदानाचा टक्क्याचा नेमका कोणत्या उमेदवाराला फटका बसणार हे 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.